1 जुलैपासून रेल्वेच्या तिकिटांच्या किंमती वाढतील
Marathi June 25, 2025 01:25 PM

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

रेल्वे प्रवास 1 जुलैपासून महाग होणार आहे. रेल्वे विभागाने प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय मंगळवारी घोषित केला. ही भाडेवाढ सामान्य प्रवासी तसेच दूर अंतराचा प्रवास करणारे प्रवासी अशा दोहोंसाठी कमी अधिक प्रमाणात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, ही भाडेवाढ करताना केंद्र सरकारने एक दिलासाही दिला आहे. काही श्रेणी दरवाढीपासून मुक्त ठेवलेल्या आहेत.

सामान्य द्वितीय वर्गाच्या प्रवासभाड्यात 500 किलोमीटरच्या अंतरापर्यंत कोणतीही भाडेवाढ करण्यात आलेली नाही. मात्र, प्रवास 500 किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर प्रत्येक जास्तीच्या किलोमीटरमागे अर्धा पैसा अधिक द्यावा लागणार आहे. मेल किंवा एक्स्प्रेस बिगर वातानुकुलित प्रवासासाठी आता प्रत्येक किलोमीटर मागे 1 पैसा अधिक द्यावा लागणार आहे. वातानुकुलीत डब्यांमधून प्रवास करण्यासाठी प्रत्येक किलोमीटर मागे 2 पैशांची वाढ करण्यात आली आहे.

लोकल प्रवास भाडेवाढ नाही

शहरी किंवा लोकल गाड्यांमधून प्रवासासाठी कोणतीही भाडेवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबईसारख्या शहरांमधील सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषत: मुंबईकर नागरीक जे स्थानिक किंवा लोकल गाड्यांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात, त्यांना दिलासा मिळाला आहे.

मासिक, सिझन पास दरवाढ नाही

मासिक पास किंवा सिझन तिकिट दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. अशा प्रकारे ही दरवाढ किरकोळ असून तिच्यातून सामान्य प्रवाशांना वगळण्यात आले असल्याचे दिसून येते. तसेच प्रथम वर्ग आणि वातानुकुलीत वर्गाच्या प्रवासामध्येही अत्यल्प दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ महागाई दरात होणाऱ्या वाढीच्या तुलनेत अत्यंत कमी आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कन्फर्म तिकिटांचीही सुविधा

आतापर्यंत प्रवासांना प्रवासाला प्रारंभ होण्याअगोदर चार तासांपर्यंत त्यांचे तिकिट कन्फर्म आहे किंवा नाही याची माहिती मिळत नव्हती. तथापि रेल्वेने आता या नियमात सुधारणा केली आहे. आता तिकिट निश्चित आहे की नाही, याची माहिती 24 तासा आधी देण्यात येणार आहे. रेल्वेने यासंबंधीची प्रायोगिक योजना राजस्थानच्या बिकानेर विभागात लागू केली आहे. तिचा परिणाम पाहून ती संपूर्ण देशासाठी काही काळानंतर लागू होणार आहे, अशीही माहिती देण्यात आली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.