AUS vs SA WTC Final 2025: एडन मार्करमचे शतक अन् टेम्बा बवुमाची विक्रमी साथ; दक्षिण आफ्रिका इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर
esakal June 14, 2025 05:45 AM

Australia vs South Africa in : दक्षिण आफ्रिकेने अनपेक्षित खेळ करताना जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२५ च्या जेतेपदाच्या दिशेने वाटचाल केली आहे. एडन मार्करम व कर्णधार टेम्बा बवुमा यांनी तिसऱ्या विकेटसाठी विक्रमी शतकी भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला हार मानण्यास भाग पाडले आहे. गतविजेत्या ऑसींची देहबोली पाहून त्यांनीही हार पत्करली असल्याचे दिसतेय. टेम्बाच्या मांडीचे स्नायू ताणले गेले तरीही तो देशाला २७ वर्षानंतर आयसीसी स्पर्धा जिंकून देण्यासाठी मैदानावर उभा राहिला. मार्करमने शतकी खेळी केली.

कागिसो रबाडाने ( ५-५१) भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१२ धावांवर गुंडाळला. त्याल मार्को यान्सेनची ( ३ विकेट्स) साथ मिळाली. पण, पॅट कमिन्सने ६ विकेट्स घेत आफ्रिकेचा पहिला डाव १३८ धावांवर गुंडाळून संघाला मजबूत आघाडी मिळवून दिली. ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावातही अवस्था ७ बाद ७३ अशी झाली होती. अॅलेक्स केरी ( ४३) व मिचेल स्टार्क यांनी ८५ चेंडूंत ६१ धावांची भागीदारी करून संघाची गाडी रुळावर आणली. त्यानंतर स्टार्क शेवटपर्यंत मैदानावर उभा राहिला. त्याने नॅथन लियॉनसह १४ व जोश हेझलवूडसह ५९ ( १३५ चेंडू) धावांची भागीदारी केली.

ऑस्ट्रेलियाने ७ बाद ७३ वरून २०७ धावांपर्यंत मजल मारली आणि आफ्रिकेसमोर २८१ धावांचे आव्हान ठेवले. स्टार्क १३६ चेंडूंत ५ चौकारांसह ५८ धावांवर नाबाद राहिला.कागिसो रबाडाने दुसऱ्या डावातही ४ विकेट्स घेतल्या. लुंगी एनगिडीने ३ विकेट्स मिळवल्या. लॉर्ड्सवरील आफ्रिकेला पुन्हा एकदा कसोटीतील त्यांच्या सर्वोत्तम लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे. फलंदाजीत बहुमूल्य योगदान दिल्यानंतर स्टार्कने तिसऱ्या षटकात रायन रिकेल्टनला ( ६) माघारी पाठवले. बाहेरच्या चेंडूवर मारण्याच्या प्रयत्नात तो यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरीच्या हाती झेल देऊन बाद झाला.

एडन मार्करम व ब्यू मुल्डर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९३ चेंडूंत ६१ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाचा तणाव वाढवला होता. मिचेल स्टार्कनेच ही जोडी तोडली आणि मुल्डर २७ धावांवर मार्नस लाबुशेनच्या हाती सोपा झेल देऊन परतला. कर्णधार टेम्बा बवुमाचा झेल स्टीव्ह स्मिथने टाकला. झेल घेण्याच्या प्रयत्नात स्मिथने खांद्याला व बोटाला दुखापत करून घेतली आणि मैदानाबाहेर गेला. बवुमाच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते आणि त्यामुळे त्याच्या फुटवर्कवर मर्यादा आलेल्या दिसल्या. पण, तरीही बवुमा तिसऱ्या विकेटसाठी शतकी मार्करमसह उभा राहिला आणि शतकी भागीदारी केली. दरम्यान, स्टीव्ह स्मिथच्या उजव्या करंगळीला दुखापत झाली आहे आणि त्याला एक्स-रे आणि स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

ICC WTC Final मध्ये १००+ धावांची भागीदारी करणारी ही तिसरी जोडी ठरली. यापूर्वी २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेड व स्टीव्ह स्मिथ यांनी भारताविरुद्ध २८५ धावा जोडल्या होत्या. त्याच सामन्यात भारताच्या अजिंक्य रहाणे व शार्दूल ठाकूर यांनी १०९ धावांची भागीदारी केली होती. आज टेम्बा व मार्करम यांनी अजिंक्य-शार्दूलचा विक्रमही मोडला. मार्करमने चौकार मारून १५६ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले आणि आफ्रिकेला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. तिसऱ्या दिवस संपला तेव्हा आफ्रिकेने २ बाद २१३ धावा केल्या होत्या आणि त्यांना विजयासाठी ६९ धावा हव्या होत्या. त्यांच्या हातात ८ विकेट्स आहेत. मार्करम १५९ चेंडूंत ११ चौकारांसह १०२ धावांवर नाबाद आहे, तर बवुमाने १२१ चेंडूंत ५ चौकारांसह ६५ धावांची नाबाद खेळी केली आहे. दोघांनी ३८.२ षटकांत १४३ धावांची नाबाद भागीदारी पूर्ण केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.