घर सजवताना नवीन वस्तूंवर खर्च करण्याऐवजी जुन्या वापरलेल्या वस्तूंना नवीन रूप देऊनही सजावटीला वेगळा आयाम देता येतो. पुनर्वापर करून केलेली घरसजावट खर्चाची बचत करतेच, शिवाय ती तुमच्या घराला एक ‘वैयक्तिक टच’ही देते. पुनर्वापर कुठे कुठे करता येईल आणि काय करता येईल याबाबतच्या काही टिप्स बघूया.
जुन्या बाटल्यांचा वापर
आपल्या घरात अनेक प्रकारच्या बाटल्या पडून असतात. काचेपासून प्लॅस्टिकपर्यंतच्या अनेक बाटल्यांचा वापर करून कलात्मक वस्तू तयार करता येतात. काचेच्या जुन्या बाटल्यांवर रंग, फेविकोल आणि वेगवेगळ्या प्रकारचे दोरे यांचा वापर करून त्यांना छान कलात्मक रूप देता येतं. या कलात्मक बाटल्या अभ्यासाच्या टेबलपासून हॉलमधल्या एखाद्या कोपऱ्यापर्यंत कुठेही ठेवता येतात. तुम्ही त्यांचा फ्लॉवरपॉट म्हणून वापर करू शकता, किंवा मनीप्लॅंटसारख्या काही वेलीही त्यात लावू शकता.
स्टोरेज सोल्यूशन्स
जॅम आणि लोणच्यांच्या बाटल्या छान आकाराच्या असतात. त्या सजवून तुम्ही स्टोरेज सोल्युशन म्हणून त्यांचा वापर करू शकता. किचनमधील मसाले, पेन्सिल किंवा छोट्या वस्तू अशा अनेक गोष्टी ठेवण्यासाठी त्यांचा वापर तुम्हाला करता येईल.
जुन्या कपड्यांच्या मदतीने सजावट
घरातल्या जुन्या साड्या, ओढण्या यांचा वापर किती तरी कलात्मक गोष्टींसाठी करता येतो. जुन्या साड्या, टी-शर्ट्स किंवा जीन्सच्या फॅब्रिकपासून कुशन कव्हर्स शिवता येतात. साड्यांचे कलात्मक पडदे तर सुंदरच दिसतात. कापडांच्या वेगवेगळे तुकडे एकत्र करून अतिशय सुंदर, रंगीबेरंगी आणि कलात्मक गालिचा तुम्हाला तयार करता येईल.
वॉल हँगिंग्ज
जुनं कापड, पुठ्ठे, कागद, मणि, बटणे अशा गोष्टींचा वापर करून उत्तम वॉल हँगिंग्ज तयार करता येतात. तुमची सगळी कलात्मकता तुम्हाला त्यात दाखवता येते.
जुन्या फर्निचरचं रूपांतर
नवीन फर्निचरमुळेच घर छान दिसतं असं काही नाही. जुन्या फर्निचरला तुम्ही नवा लूक देऊ शकता. टीपॉयपासून कपाट, कपाटाचे टेबल अशी पाहिजे ती रूपांतरं तुम्हाला करता येतात. जुने सोफे, खुर्च्या यांना रंग देऊन किंवा वूड पॉलिश लावून स्टाइलिश लूक देऊ शकता. खुर्च्यांच्या पायांना रंगीत दोरे गुंडाळून ट्रेंडी लूक तयार करण्यासारखे प्रयोगही तुम्ही करू शकता.
वृत्तपत्रे, पुस्तके आणि कार्डबोर्डची सजावट
जुन्या वृत्तपत्रांचा वापर करून बाऊल्स, फ्रेम्स किंवा इतर अनेक वस्तू तयार करता येतात. जुन्या पुस्तकांच्या पानांपासून कोलाज तयार करून भिंती सजवता येतात. किंवा कार्डबोर्ड बॉक्सपासून शेल्फ, ऑर्गनायझर किंवा पेन स्टँड तयार करा.
इलेक्ट्रॉनिक टाकाऊ वस्तूंचा वापर
इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरण्यायोग्य राहत नाहीत तेव्हा त्यांचं काय करायचं असा प्रश्न पडतो. अशा वेळी तुम्ही तुमची कल्पकता वापरून सजावट करू शकता. जुन्या सीडींना पेंट करून वॉल आर्ट किंवा मोबाइल हँगिंग बनवू शकता. किंवा चक्क कीबोर्डच्या बटणांचा वापर करून फ्रीज मॅग्नेट्स किंवा इयररिंग्ज बनवता येतात. त्यासाठी तुम्ही युट्यूबवरचे व्हिडिओ बघून प्रेरणा घेऊ शकता.
नैसर्गिक सामग्रीचा वापर
नारळाच्या करवंट्या, लाकडी फांद्या, दगड, शिंपले अशा किती तरी नैसर्गिक वस्तूंचा वापर तुम्ही सजावटीसाठी करू शकता. सुंदर दगड गोळा करून त्यांना रंगवून छान वापर करता येतो... पुनर्वापराच्या वस्तूंपासून केलेली सजावट केवळ पर्यावरणास अनुकूल नाही, तर ती तुमच्या घराला एक वैयक्तिक आणि कलात्मक स्वरूप देते. चला तर, आजपासूनच जुन्या वस्तू फेकण्याऐवजी त्यांना नवीन रूप देण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या घराला एक अनोखी स्टाइल द्या.