भविष्याची मानसिक तयारी
esakal June 14, 2025 01:45 PM

- शलाका तांबे, लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक

आपल्या प्रत्येकालाच आयुष्यात अनेक गोष्टी करायची इच्छा असते, आणि या इच्छा पूर्ण करता याव्यात याच्यासाठी भविष्याचं योग्य नियोजन अनिवार्य असतं. भविष्याच्या तयारीसाठी सर्वांत आधी आपण, मानसिकरित्या भविष्याबद्दल कसं, किती आणि कोणत्या पद्धतीनं विचार करतो, ही तयारी करणं आवश्यक असते.

मागच्या लेखात आपण आपल्या रोजच्या धावपळीमध्ये, ‘विचारांचं नियोजन कसं करावं’ हे बघितलं. याच विषयाला थोडं अजून पुढे नेऊन, भविष्याच्या दृष्टीनं, आपल्या विचारांचं नियोजन कसं करावं, हे आज आपण बघुयात.

आपली दैनंदिन कार्यक्षमता वाढवण्यासाठी जशी एक सुनियोजित जीवनशैली आवश्यक असते, तसंच भविष्याचा सक्रियपणे विचार करण्यासाठी आणि आपल्या भविष्याचं योग्य नियोजन करण्यासाठी एक ‘सुनियोजित विचारशैली’ विकसित करणं आवश्यक असतं.

आता सुनियोजित जीवनशैली म्हणजे आपण जाणीवपूर्वक लावून घेतलेल्या काही सवयी- उदाहरणार्थ एक ठराविक रूटिन पाळणं, आपल्या दिनचर्येला शिस्त असणं, चांगल्या जीवनशैलीविषयक सवयी वगैरे. सुनियोजित विचारशैली म्हणजे आपल्या भविष्याच्या सक्रिय नियोजनासाठी काही विचारशैलींना आत्मसात करणं, आणि त्याप्रमाणे विचार करण्याची स्वतःला सवय लावणं.

हे एक खूप महत्त्वाचं जीवनकौशल्य आहे- जे आपल्याला करिअर प्लॅनिंगमध्ये, वैयक्तिक आयुष्याची ध्येयं गाठण्यामध्ये, कौटुंबिक ध्येयं साध्य करण्यामध्ये सपोर्ट करतं. सुनियोजित विचारशैली म्हणजे स्वतःला योग्य प्रश्न विचारता येणं, आपल्याकडे असलेल्या माहितीचं विश्लेषण करणं त्यातून योग्य निष्कर्ष काढणं, आपल्या विचारांना तर्काचा आधार देणं.

भविष्याचं सक्रियपणे नियोजन करायचं असतं, तेव्हा दोन प्रकारच्या विचारशैली आत्मसात करण्यावर भर असावा,

१. धोरणात्मक विचार (Strategic Thinking)

२. चिकित्सक विचार (Crtitical thinking)

स्ट्रॅटेजिक थिंकिंग म्हणजे, निकटच्या काळात आणि दीर्घकालात आपल्याला काय ध्येयं साध्य करायची आहेत हे स्पष्टपणे ओळखणं आणि ती साध्य करण्यासाठी योग्य योजना बनवणं. यासाठी तुम्हाला तुमची जीवनदृष्टी आणि तुमची महत्त्वाची ध्येयं प्रामाणिकपणे ठरवायला लागतात.

क्रिटिकल थिंकिंग म्हणजे ही जीवनदृष्टी आणि ध्येयं साध्य करण्यासाठी मला काय करावं लागेल, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल, माझा वेळ, माझी ऊर्जा कुठे लावावी लागेल यांचा विचार करणं. मग स्ट्रॅटेजिक आणि क्रिटिकल थिंकिंगची स्वतःला सवय लावण्यासाठी, एक फ्रेमवर्क बघुयात.

पाच प्रश्न, पाच विचार

हे पाच प्रश्न आणि पाच विचार तुम्हाला तुमची जीवनदृष्टी, ध्येयं आणि त्यासाठी काय करायला पाहिजे याबद्दल स्पष्टता आणण्यास उपयुक्त ठरू शकतात.

प्रश्न १ : मी सध्या कोणत्या ध्येयासाठी सक्रियपणे काम करत आहे? हे ध्येय माझ्या जीवनदृष्टीबरोबर संरेखित आहे का? : कुठल्या गोष्टींमधे झोकून देण्याआधी स्वतःला हा प्रश्न नक्की विचारावा.

प्रश्न २ : हे ध्येय साध्य करण्यासाठी माझी आत्ताची कौशल्यं supportive आहेत का? : या प्रश्नाचे उत्तर हो असेल तर उत्तम, नाहीतर योग्य ते बदल करण्यासाठी आणि तुमची स्वप्न आणि वस्तुस्थितीमधील गॅप कमी करण्यामध्ये हा प्रश्न सहाय्यक होऊ शकतो.

प्रश्न ३ : हे ध्येय साध्य करण्यासाठी माझी आत्ताची जीवनशैली, माझ्या आत्ताच्या सवयी supportive आहेत का? : ‘Your habits are either a bridge to your future or barrier’. तुमचं ध्येय समोर ठेवून तुम्हाला हवे ते results मिळवण्यासाठी, तुमच्या सवयी आणि तुमची जीवनशैली योग्यरित्या निवडा.

प्रश्न ४ : असं काही आहे का- जे मला माहीत आहे की माझ्या ध्येयपूर्तीसाठी आवश्यक आहे; पण मी टाळतीये? : कधी कधी आपण कोणत्यातरी कारणामुळे, भीतीमुळे काही गोष्टी करायच्या टाळतो, काही निर्णय घ्यायला घाबरतो; पण आपल्यालाही माहीत असतं, की हे आवश्यक आहे. अशा गोष्टी सकारात्मकपणे करण्यासाठी स्वतःला self-motivate करणं आवश्यक असतं.

प्रश्न ५ : माझ्या ध्येयपूर्तीमध्ये, कोण मला अधिक चांगल्या प्रकारे गाईड करू शकते? अशा व्यक्तींबरोबर कसा जास्त वेळ घालवता येईल? : आपल्या सभोवतालचे लोक आपल्या मानसिकतेला, आपल्या सवयींना आणि आपल्या महत्त्वाकांक्षांना आकार देत असतात. म्हणून आपण कुणाबरोबर किती वेळ घालवायचा हे जाणीवपूर्वक ठरवणंही आवश्यक असतं.

तुमची ध्येयं कोणतीही असोत- करिअरची, वैयक्तिक आयुष्यातील, की कुटुंबाच्या भविष्यासाठी - तुम्ही ‘सुनियोजित विचारशैली’ आत्मसात करून तुमच्या भविष्यासाठी मानसिकरित्या तयारी नक्कीच करू शकता. ‘मानसभान’ ठेवून या पाच प्रश्नांचं हे फ्रेमवर्क वापरून स्ट्रॅटेजिक आणि क्रिटिकल थिंकिंगची सवय स्वतःला नक्कीच लावू शकता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.