AB de Villiers emotional after South Africa wins : दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्स हा आज आफ्रिकेच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील विजयानंतर भावनिक झाला. गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर द. आफ्रिकेने ५ विकेट्सने पराभूत केले. १९९८ नंतर आफ्रिकेने आयसीसी स्पर्धा जिंकली. आफ्रिकेला आयसीसी स्पर्धेच्या जेतेपदाचा मान पटकावण्यासाठी २७ वर्ष लागली आणि हा क्षण टीपण्यासाठी एबी डिव्हिलियर्सने मोबाईल खिशातून काढला. तो मोबाईलवर हा क्षण टिपत होता, पंरतु त्याचा कंठ दाटून आला होता. डोळे पाणावले होते... हा क्षण त्याच्यासाठी खूप खास होता.
हे वर्ष एबीसाठी स्वप्नपूर्तीचे ठरले... इंडियन प्रीमिअर लीगमध्ये तो ज्या संघाकडून बरीच वर्ष खेळला, त्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १७ वर्षांनंतर आयपीएल २०२५ जेतेपद नावावर केले. विराट कोहलीने जेव्हा विजयी जल्लोष केला, तेव्हा एबी डिव्हिलियर्स सीमारेषेवर उभा होता आणि तेव्हाही तो भावुक झालेला. आज त्याच भावना त्याने पुन्हा अनुभवल्या. कायल वेरेयनेने विजयी धाव घेतल्यानंतर प्रेक्षकांमध्ये बसलेला एबी उभा राहिला आणि जल्लोष करताना दिसला.
त्याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली, "अभिनंदन Proteas, शानदार विजय आणि खूप चांगला खेळ! मॅचविनिंग शतकासाठी एडन मार्करामला आणि शांत व तितकंच आक्रमक नेतृत्व केल्याबद्दल टेम्बा बवुमाला सलाम. क्रिकेटचा हा सुंदर फॉरमॅट पाहण्याचा अनुभव किती अविश्वसनीय होता. खेळात नाट्यमय वळणं, घालमेल आणि गोड शेवट, हे सर्व आज अनुभवले," असे डिव्हिलियर्सने लिहिले.
दक्षिण आफ्रिकेने ९७२२ दिवसानंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली. १९९८ मध्ये त्यांनी हॅन्सी क्रोनिएच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफ जिंकली होती. आज त्यांनी लॉर्ड्सवर २८२ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आणि कसोटी क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही पाचवी सर्वोत्तम धावसंख्या आहे. लॉर्ड्सवरील हा दुसरा मोठा विजय आहे.
दक्षिण आफ्रिकेचा हा सलग आठवा कसोटी विजय आहे. मागील वर्षी वेस्ट इंडिजला पराभूत केल्यानंतर आफ्रिकेने सलग ८ सामने जिंकले. ही त्यांची दुसरी सर्वात मोठी विजयी मालिका आहे. यापूर्वी २००२-०३ मध्ये त्यांनी सलग ९ कसोटी सामने जिंकले होते.