Kothrud News : कोथरूड मधील शुभंकर सोसायटी पाडताना शेजारील इमारतीवर झुकल्याने नागरिकात घबराट
esakal June 15, 2025 05:45 AM

कोथरूड - कोथरूडच्या डावी भुसारी मधील शुभंकर सोसायटी पुनर्निर्माण करण्यात येत आहे. त्यासाठी या इमारतीचे पाडकाम सुरू करण्यात आले होते. मात्र पुरेशी काळजी न घेतल्याने शेजारील इमारतीवर पाडण्यात येत असलेली इमारत झुकली. त्यामुळे शेजारच्या कलाग्राम, शिवतीर्थ आदी सोसायटीमधील रहिवाशांमध्ये घबराट पसरली.

हे काम करताना स्थापत्य अभियंता किंवा आर्किटेक समोर उपस्थित नव्हते याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. शेजारील कलाग्राम सोसायटीचे अध्यक्ष अंकुश घारे म्हटले की, आमच्या सोसायटीला या संदर्भात कोणतीही लेखी सूचना देण्यात आलेली नव्हती. अचानक जोरदार आवाज आल्यामुळे आमच्या घरातील सर्व घाबरले.

पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी आजूबाजूच्या सोसायटीमधील ६३ कुटुंबीयांना सुरक्षित ठिकाणी हलवले. रात्रीच्या वेळी आम्ही आता राहायचे कुठे? व खायचे काय? आमच्या घरातील मालमत्तेचे काय होणार असा प्रश्न यावेळी रहिवाशांनी विचारला.

महेश गुरुनाथ म्हणाले की, एमएनजीएल वाहिनी आमच्या इमारतीमध्ये आहे. जर पाडापाडीत आग लागली वा इतर काही घडले तर काय करायचे असा प्रश्न आम्हाला पडला आहे.

पुणे महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता जे. बी. पवार यांनी आर्किटेक स्थापत्य इंजिनियर यांच्या देखरेखीखाली इमारत पाडायला हवी होती पण ते तिथे कोणीही हजर नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

शिवतीर्थ सोसायटी मधील अमित पोरे म्हणाले की, आमच्या सोसायटीतील सर्वांना बाहेर काढलेले आहे. पण घर सोडून जायचे कोठे हा प्रश्न पडला आहे. शेजारील अंकुर इमारतीच्या बाजूला पत्रे तुटून पडले व कुंपण तुटले. यावेळी कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप देशमाने, कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजय नायकल उपस्थित होते.

बाजूच्या सोसायटी मधील रहिवाशांची राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी घटनास्थळी उपस्थित असलेले प्रशांत कनोजिया, गणेश वरपे, रमेश उभे, माजी नगरसेविका अल्पना वरपे यांनी केली.

पुणे महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता जे. बी. पवार यांनी सांगितले की, शेजारील इमारती मधील रहिवाशांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यासाठी संबंधितांना सांगितले आहे. येथे काही दुर्घटना घडू नये याला आता आमचे प्राधान्य आहे. अनियमितता व इतर बाबी बाबतीची पाहणी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.