डिसेंबरमध्ये होणाऱ्या स्पर्धेत भारताचा क गटात समावेश, प्रथमच 24 संघांचा सहभाग
वृत्तसंस्था/ लुसाने
येत्या डिसेंबरमध्ये चिलीतील सांतियागो येथे होणाऱ्या एफआयएच कनिष्ठ महिला हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा समावेश गट क मध्ये करण्यात आला असून याच गटात पॉवरहाऊस जर्मनी, आयर्लंड व नामिबिया यांचाही समावेश आहे.
दर दोन वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेची ही 11 वी आवृत्ती आहे. यावेळी या स्पर्धेत संघांची संख्या वाढवून 24 करण्यात आली आहे. त्यांचे चार संघांचे सहा गट करण्यात आले आहेत. पाचवेळचे चॅम्पियन्स नेदरलँड्सला अ गटात, दोनवेळचे विजेते अर्जेन्टिनाला ब गटात स्थान देण्यात आले आहे. 1 ते 13 डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळविली जाणार आहे. 2023 मध्ये सांतियागो येथेच झालेल्या स्पर्धेत 16 संघांचा सहभाग होता.
‘सांतियागो, चिली येथे होणाऱ्या महिला ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात आला असून वाढीव 24 संघांचे विविध गट यावेळी निश्चित करण्यात आले,’ असे एफआयएचने पत्रकाद्वारे सांगितले. ही प्रतिष्ठेची स्पर्धा भारताला अद्याप एकदाही जिंकता आलेली नाही. 2013 मध्ये झालेल्या स्पर्धेत तिसरे स्थान मिळवित भारताने आपली सर्वोच्च कामगिरी नेंदवले आहे. जर्मनीतील मोंचेनग्लाडबाच येथे ही स्पर्धा झाली होती. त्यानंतर द.आफ्रिकेतील पोश्चेफस्ट्रूम येथे 2022 मध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने चौथे स्थान मिळविले होते.
भारतीय संघाचे नेतृत्व गोलरक्षक निधी करीत असून अलीकडेच अर्जेन्टिनात झालेल्या चौरंगी स्पर्धेतील खेळाडूंचाही त्यात समावेश आहे. वर्ल्ड कपच्या तयारीसाठी आयोजिलेल्या त्या स्पर्धेत भारताने 4 सामने जिंकले तर दोन सामने गमविले. उरुग्वेला त्यांनी दोनदा तर चिली व अर्जेन्टिना यांच्याविरुद्ध एकेक सामने जिंकले. ‘प्रथमच 24 संघांचा सहभाग असलेली कनिष्ठ महिलांची हॉकी विश्वचषक स्पर्धा चिलीमध्ये आयोजित करताना आनंद होतोय. तसेच या स्पर्धेचा ड्रॉ काढण्याचा सोहळाही चिलीमध्ये पहिल्यांदाच आयोजित करता आला, हा आमच्यासाठी सन्मानाचा आणि जबाबदारीचा खास क्षण आहे,’ असे चिली हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष आंद्रेस डी विट म्हणाले.
कनिष्ठ महिला वर्ल्ड कपची गटवारी
गट अ : नेदरलँड्स, जपान, चिली, मलेशिया
गट ब : अर्जेन्टिना, बेल्जियम, झिम्बाब्वे, वेल्स
आतडे अ: भारत, जर्मनी, इर्लंड, नामीबिया
गट ड : इंग्लंड, द.आफ्रिका, चीन, ऑस्ट्रिया
गट ई : ऑस्ट्रेलिया, कॅनडा, स्पेन, स्कॉटलंड
गट फ : अमेरिका, कोरिया, न्यूझीलंड, उरुग्वे.