Video: राजकोटमध्ये तुफान पाऊस; रस्त्यावर गाड्या डोळ्यासमोर वाहून गेल्या! थरारक व्हिडिओ व्हायरल
esakal June 15, 2025 07:45 AM

Rajkot Rain Update : गुजरातमधील शहर असलेल्या राजकोटमध्ये सध्या तुफान पाऊस बरसत असून शहरातील मुख्य रस्त्यांवरुन वेगानं पाणी वाहत आहे. याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडिायावर लोकांनी शेअर केले आहेत. पावसानं इथं इतकं रौद्ररुप धारण केलं आहे की यामध्ये रस्त्यावरील गाड्या मालकांच्या डोळ्यादेखत वाहून जाताना दिसत आहेत. या घटनेचा थरारक व्हिडिओ एकदा पाहाच.

व्हिडिओत काय?

राजकोटमध्ये सध्या तुफान पाऊस बरसत असून तास-दीड तासांत इथं तीन इंच पाऊस पडलाय. शहरातील मुख्य रस्त्यावर एका दुकानाबाहेर लावलेल्या दुचाक्या भीषण पावसाच्या लोंढ्यापुढं तग धरु शकलेल्या नाहीत. अनेक नागरिकांच्या या दुचाक्या चक्क पावसाच्या पाण्यात वाहून जाताना दिसत आहेत.

यामध्ये एक व्यक्ती आपली अॅक्टिव्हा वाहून जात असताना तिला रोखण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसतो आहे. याच व्यक्तीनं हा व्हिडिओ देखील आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. तसंच बाजुनं एक कार देखील जात आहे, पण त्याच्या चालकालाही त्यावरील नियंत्रण गमावल्याचं दिसतं आहे.

दरम्यान, आकाशात काळे कुट्ट ढग दाटून आले असून विजाही चमकताना दिसत आहेत. विशेष म्हणजे लोक या पाण्याच्या लोंढ्यातून जीवघेणा मार्ग काढताना दिसत आहेत. त्यामुळं गुजरातमध्ये विशिषतः राजकोटमध्ये सध्या मॉन्सूनच्या पावसानं अक्षरशः थैमान घातल्याचं दिसून येत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.