डॉ. सतीश बडवे -editor@esakal.com
पुस्तकाचे नाव :
गोष्ट छोटी डोंगराएवढी
लेखक : अरविंद जगताप
प्रकाशक :आदित्य प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर
(संपर्क : ८४४६७९६५५७)
पृष्ठे : १७६ मूल्य :२५० रुपये.
एखाद्या लेखकाकडे भवतालाला प्रभावीपणे जिवंत करण्याची ताकद असते. हे कसब सर्वांनाच साधते असे नाही. सामान्य माणसे, त्यांची स्वप्ने, त्यांचे जगणे, त्यांचे वागणे आणि त्यांच्या आयुष्यातल्या घडामोडी यांचे चित्रदर्शी वर्णन करीत गाव आणि त्यातील माणसांच्या जगण्यातल्या साध्या साध्या गोष्टी बारीकसारीक निरीक्षणांसह मांडण्याचे कौशल्य अरविंद जगताप यांच्या ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या पुस्तकातून प्रत्ययाला येते. शीर्षकात जसे म्हटले आहे, तशाच या छोट्या गोष्टी आहेत; पण ज्या व्यक्तींच्या या गोष्टी आहेत, त्यांच्यासाठी वा त्यांच्या परिवारातील व्यक्तींसाठी त्या डोंगराएवढ्या मोठ्या आहेत. या छोट्या गोष्टींमधून उभ्या राहणाऱ्या साध्या, सरळमार्गी, बेरकी व अगतिक माणसांच्या स्वभावाचे कितीतरी कंगोरे प्रकटलेले आहेत. म्हटले तर या छोट्या गोष्टी आहेत, पण नीट विचार केला तर या अनेकांच्या जीवनकहाण्या आहेत.
या लेखनातले सर्वांत महत्त्वाचे सूत्र म्हणजे गावखेड्यात विखुरलेल्या सामान्य, अतिसामान्य माणसांचे व शेतकऱ्यांचे वेदनादायी जगणे आहे. क्वचित त्यात नर्मविनोदाची पखरण होते; पण ती क्षणिक असते. घडणाऱ्या घटनांचा या माणसांच्या जगण्यावर झालेला खोल परिणाम छोट्या अवकाशातून शोधला जातो; आणि म्हणता म्हणता या गोष्टी डोंगराएवढ्या भासू लागतात. कारण आत्तापर्यंत मनात रुजलेलं, कथा-कादंबऱ्यांमधून रंगवले गेलेले गाव वर्तमानात तसे राहिलेले नाही. बदलत्या कालमानाचा विपरीत परिणाम गावावर झालेला आहे.
गावखेड्यातला हा बदल सूक्ष्मपणे न्याहाळत त्या हरवलेल्या गावाचे, शेतीचे, शेतकऱ्याचे विकृत आणि कुरूप झालेले रूप, बदलत गेलेली माणसे आणि त्यांची मानसिकता यातून अवनत अवस्थेला पोचलेल्या माणसांचे हे वास्तव चित्र अरविंद जगताप यांच्या नानाविध व्यक्तिचित्रांमधून उलगडले जाते. त्यामुळेच रूढार्थाने यातल्या गोष्टी केवळ त्या माणसांविषयीच बोलत नाहीत तर उद्ध्वस्त होत चाललेल्या विस्तीर्ण ग्रामसंस्कृतीचा ऱ्हास चित्रित करतात. त्यातून उजाड झालेले खेडे, हताश व अगतिक झालेला शेतकरी, संवादाविना गर्तेत गेलेली बायाबापडी, दारूबरोबरच मोबाइलच्या व्यसनात अडकलेली तरुण पिढी, व्यवस्थेचे चटके सहन करणारी माणसे अशा अनेक बाबी पुढे येतात. ग्रामजीवनाचा विद्रूप चेहराच या गोष्टींमधून प्रतिबिंबित होत जातो. आधुनिकतेमुळे आलेले कुरूपपण या पुस्तकातील छोट्या छोट्या गोष्टींमधून वाचकाच्या पुढ्यात येते. संपन्न खेड्यांचे विपन्न होत जाणे; ही खंत लेखकाबरोबरच वाचकाच्याही मनात निर्माण होत जाते.
मुलगी झाल्याचं दुःख या पुरुषी मानसिकतेचे बळी असणारे पुरुष अजूनही गावोगावी सापडतात. बंडू त्यातलाच एक. मुलीच्या पाठीवर बायकोला दिवस गेल्यानंतर सलीमच्या सांगण्यावरून चाटे डॉक्टरांकडे गेला. सोनोग्राफीनंतर मुलगाच होणार हे डॉक्टरांनी सांगितले. प्रत्यक्षात तसे घडले नाही. मुलगीच झाली. बंडूने दवाखान्यात दंगा केला. शेवटी डॉक्टरांनी दर महिन्याला पैसे द्यायचे कबूल केले. मग बंडूने काम करणे सोडून दिवसरात्र दारू पिणे सुरू केले. डॉक्टरांनी मुलीला इंग्रजी शाळेत टाकून तिची फीदेखील भरली. पण एक दिवस गर्भपाताच्या गुन्ह्यामुळे चाटे डॉक्टरांना शिक्षा झाली. बंडू उद्ध्वस्त झाला. ‘पोरीकडे लक्ष ठेवा’ असे म्हणून पैसे पदरात पाडून घेणाऱ्या बंडूला जेलमधून बाहेर पडताना हेच वाक्य डॉक्टर चाटेही म्हणाले. आता यात बंडूच्या मुलींचा काय दोष? त्याही पुरुषी मानसिकतेच्याच बळी ठरतात. तिचा बाप राक्षस आहे म्हणून अपमानित होण्याचे तिच्या नशिबात आल्याची ही साधी गोष्ट.
साध्या प्रसंगामधून उद्ध्वस्त होत जाणारं कुटुंबाचं स्वप्न एका क्षणात संपतं आणि छोट्या गोष्टीतलं डोंगराएवढं दुःख वाचकालाही अस्वस्थ करते. अरविंद जगताप यांनी अशा खूप गोष्टी या पुस्तकात सांगितल्या आहेत. त्यातून सामान्य माणसाच्या जगण्याची कितीतरी रूपं दिसू लागतात. अरविंद जगताप यांच्या या गोष्टी खरे तर आपल्याच अवतीभोवतीच्या आहेत. सूक्ष्म निरीक्षणातून त्यातील बारकावे त्यांनी टिपले आहेत.
अरविंद जगताप यांच्या या छोट्या गोष्टींचे बलस्थान त्यांच्या सांगण्याच्या संवादी शैलीत दडलेले आहे. आपल्याकडे कहाणी सांगण्याची परंपरा आहे. गोष्टीवेल्हाळ मराठी माणसाला गोष्ट रंगवून सांगण्याची हौस असते. कथनाची एक विशिष्ट धाटणी वा शैली ऐकणाऱ्याला वा वाचणाऱ्याला गुंतवून ठेवते. पण अरविंद जगताप यांचा हेतू रंजनापुरता मर्यादित नाही. अशा असंख्य गोष्टी आपल्या अवतीभोवती घडत असतात, पण काही दिवसांत त्या विसरल्या जातात. मात्र जगतापांनी या छोट्या गोष्टी, सामान्य माणसे यांना आपल्या लेखनातून जिवंत केले आहे आणि त्यातून आपल्याच जगण्याकडे कसे बघता येते हे सुचवलेले आहे. छोट्या वाटणाऱ्या गोष्टीही त्या माणसांसाठी, कुटुंबासाठी, गावासाठी कशा डोंगराएवढ्या मोठ्या असतात, याकडे लक्ष वेधले आहे. सहज सांगता उमलत जाणाऱ्या या गोष्टी वाचकाला भिडतात आणि विचार करायलाही भाग पाडतात, हे नक्की.