Kolhapur : सीपीआरमध्ये मृतदेहाची हेळसांड, भरपावसात अज्ञाताला स्ट्रेचरवर सोडून कर्मचारी पाऊणतास दुसऱ्या कामात व्यस्थ
esakal July 04, 2025 05:45 PM

Kolhapur CPR Hospital : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह स्ट्रेचरवरून नेताना वाटेत पाऊण तास थांबवला. याचवेळी आलेल्या धो-धो पावसात मृतदेह भिजत राहिल्याने सीपीआरमधील वैद्यकीय गैरसुविधेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी, सीपीआर रुग्णालयातील एका वॉर्डात आज दुपारी एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला.

मृत्यूनंतर शवविच्छेदन करण्यासाठी मतृदेह शेंडापार्क येथे नेण्यात येणार होता. त्यासाठी रुग्णवाहिकेला कळविले होते. तोपर्यंत मृतदेह वॉर्डातून स्ट्रेचरवरून ठेवून पुढे आणण्यात येत होता. सीपीआरचे दोन कर्मचारी स्ट्रेचरसोबत होते. स्ट्रेचर ढकलत असताना ते वाटेत थांबले. यातील एक कर्मचारी स्ट्रेचर सोडून काही तरी चौकशी करण्यासाठी दुसऱ्या कक्षाकडे गेला. यावेळी स्ट्रेचर वाटेतच थांबवले होते. याच वेळी जोरदार पाऊस आला. दुसरा कर्मचारीही बाजूला गेला. तेव्हा मृतदेह भिजत होता. पावसाची सर कमी झाल्यानंतर मृतदेह बाजूला घेण्यात आला.

या काळात रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करण्यात येत होती तसेच पोलिस पंचनामा सुरू झाला. यात जवळपास एक तास झाला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पुढे नेण्यात आला. मृतदेह बराच काळात भिजत राहिला तरीही तो बाजूला घेण्यासाठी सीपीआरचे कर्मचारी पुढे आले नाहीत.

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

सीपीआरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आर.एस. मदने म्हणाले की, सीपीआर रुग्णालयात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. नियमानुसार मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्याची तयारी सुरू होती. त्यासाठी पोलिस पंचनामा करण्यासाठी येत होते. रुग्णवाहिका बोलवली होती. स्ट्रेचर घेऊन जाणारे दोन कर्मचारी सीपीआरचे होते.

यातील एक कर्मचारी बोलू शकत नाही. तो हातवारे करून जे संभाषण करीत होता, ते समजत नव्हते. याच वेळी पाऊस आला. पंचनामा पुरक नोंदी करण्याचे काम सुरू होते. त्यासाठी थोडाफार वेळ लागतोच. या काळात पाच-सात मिनिटे पावसाची सर आली. तेवढ्या काळात स्ट्रेचर बाजूला घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण केली. असे मदने म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.