जगातल्या ७ आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहलला प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखलं जातं. शाहजहानने बांधलेल्या या ताजमहलसारखं आलिशान घर मध्य प्रदेशातील बुरहाणपूरमध्ये एका दाम्पत्यानं बांधलंय. दाम्पत्यानं आपल्या प्रेमाचं प्रतिक म्हणून स्वत:चा ताजमहल उभा केलाय. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मध्य प्रदेशातील आनंद प्रकाश चौकसे आणि त्यांची पत्नी अंजली यांनी ताजमहलसारखं घर उभारलंय. संगमरवरी दगडात बांधलेलं हे घर ४ बीएचके आहे. ताजमहलच्या लहान प्रतिकृतीच्या रुपात ते बांधण्यात आलं आहे. इन्स्टाग्रामसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
एका इन्स्टाग्राम युजरने मध्य प्रदेशातील दाम्पत्याच्या या घराचा व्हिडीओ शेअर केला आहे. ताजमहलसारखं दिसणारं हे घर खरंच तुमचं आहे का असं युजरने दाम्पत्याला विचारलं. त्यांनी सांगितलं की, हे घर आमचंच आहे आणि ताजमहलची लहान प्रतिकृती आहे. ताजमहलच्या मीटरचे माप या घरात फुटांमध्ये बदलण्यात आलंय. ताजमहलच्या तीन पट लहान असं हे घर आहे. प्रेमाचं प्रतिक म्हणून हे घर बांधलं असून संगमरवरी घुमट, नक्षीदार खांब आणि दरवाजे लावण्यात आले आहेत.
ताजमहलसारख्या या घराचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दाम्पत्याचं सोशल मीडियावर कौतुक करण्यात येतंय. दाम्पत्याकडून हायटेक गुरुकुल चालवण्यात येतं. शाळेत २२०० पेक्षा जास्त विद्यार्थी तिथंच राहून शिक्षण घेतात. शाळेच्या जवळच त्यांनी ताजमहलसारखं घर उभारलं आहे. घराचं इतर बांधकाम करण्यासाठी जितका वेळ लागला तेवढाच वेळ घुमट बांधण्यासाठी लागला. या घराला दुहेरी भिंत आहे. एक भिंत आत आणि एक बाहेर, त्या दोन भिंतींमध्ये दोन फुटाचं अंतर आहे. यामुळे बाहेरच्या वातावरणाचा आत परिणाम होत नाही असं आनंद यांनी सांगितलं.