Kolhapur Municipal Corporation : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील माजी नगरसेवकांचा एक गट मंगळवारी (ता. १७) शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे. एकूण ३५ जणांची यादी असून त्यापैकी टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.
शहरात शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व आहे. येथे स्थानिक आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा वरचष्मा आहे. त्यांनी एक-एक करीत माजी नगरसेवकांना शिंदे गटात आणण्याचे काम सुरू केले आहे. अलीकडेच शारंगधर देशमुख यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात भेट घेतली. आणखी काहींची यादी तयार झाली असून त्यांचा प्रवेश मंगळवारी मुंबईत होणार आहे. शहरातील ३५ माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे. यातील हा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा आणखी काही दिवसांनी होणार आहे.
आमदार क्षीरसागर म्हणाले, ‘कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिंदे गटात येण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये माजी आमदारांसह काही ‘प्रमुखां’चा समावेश आहे. शिंदे गट वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. आम्ही लोकांत मिसळत आहोत. त्यांची कामे करीत आहोत. त्याचा परिणाम यानिमित्ताने दिसून येत आहे. आगामी महापालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत महायुतीत सर्वाधिक नगरसेवक हे शिंदे गटाचे असणार आहेत, याचा विश्वास आहे.’
‘शहरासह जिल्ह्यात शिंदे गटाला आणि नेत्यांना मानणारे आहेत. ते आता शिंदे सेनेत येण्यासाठी इच्छुक आहेत. याआधीच्या निवडणुकांत आम्ही कोठे कमी पडलो, याचे विश्लेषण केले आहे. आता सत्तेत आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गटाचे वर्चस्व असेल,’ असा विश्वासही क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
‘आगामी निवडणुकीसाठी सहा जणांची समिती स्थापन होईल. त्यांच्याकडून निवडणुकीची सर्व यंत्रणा हाताळली जाईल. या सहा जणांच्या समितीत महायुतीतील प्रत्येक पक्षातील दोघांचा समावेश असेल. लवकरच जिल्ह्यात शिवसेनेचा मोठा कार्यक्रम होईल. १९ जूनला वर्धापन दिन आहे. त्या दिवशी कोल्हापुरात मोठा मेळावा होईल,’ असेही आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.