Kolhapur Crime : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीशी वाद झाल्यानंतर चिडलेल्या कृष्णा शिवाजी झेंडे (वय ४७, रा. सावे, ता. शाहूवाडी) याने मुलाला घराबाहेर काढून पत्नी सुरेखावर धारदार पारळीने प्राणघातक हल्ला केला. डोक्यात व पोटावर वर्मी घाव लागल्याने सुरेखा गंभीर जखमी झाली. दरम्यान, जखमी झालेली पत्नी जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्याचे पाहून कृष्णाने त्याच पारळीने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. पत्नी सुरेखाची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर सध्या कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिसांतून व माहिती अशी, कृष्णा झेंडे हा मुंबई येथे खासगी कंपनीत नोकरीला होता. चार दिवसांपूर्वी तो गावी आला होता. शुक्रवारी त्याचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्याची तयारी घरी चालू होती. कृष्णा, पत्नी सुरेखा व मुलगा विघ्नेश घरी होते. त्यावेळी चारित्र्याच्या संशयावरून कृष्णाचा पत्नी सुरेखाबरोबर वाद झाला. त्यावेळी चिडलेल्या कृष्णाने मुलगा विघ्नेशला घराबाहेर काढले.
व पत्नी सुरेखावर धारदार पारळीने डोक्यात, पोटावर सपासप वार केले. आईचा आरडाओरडा ऐकून मुलगा विघ्नेशने बाहेरून दरवाजा मोडून काढला. दरवाजा उघडताच रक्ताने माखलेली सुरेखा दरवाजाबाहेर जमिनीवर कोसळली. रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळलेली पत्नी पाहताच ती मृत झाली असावी, असे समजून रागाने बेभान झालेल्या कृष्णाने त्याच पारळीने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली.
चारित्र्याच्या संशयावरून वारंवार भांडणे
सुरेखा व कृष्णा हे एकाच गावातील असून, त्यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र, कृष्णा पत्नी सुरेखाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावरून त्यांच्यामध्ये वारंवार भांडणे होत होती. त्यामुळेच मुंबईला राहणारी सुरेखा मुलांना घेऊन गावी राहत होती. मुलगी गायत्री परगावी इंजिनिअरिंगला आहे, तर मुलगा विघ्नेश गावातच नववीत शिकतो आहे.