Gondia News : परसवाडा सामूहिक विवाह सोहळ्यात तीन बालविवाह; १० जणांवर गुन्हा दाखल
esakal June 15, 2025 04:45 PM

गोंदिया : परसवाडा येथील हनुमान मंदिर सामूहिक विवाह समितीतर्फे परसवाडा येथे २०२३ रोजी आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात सातपैकी तीन बालविवाह झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी दहा जणांवर बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून आणखी काही जणांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

परसवाडा येथील राकेश वैद्य यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी तिरोडा, उपविभागीय पोलिस अधिकारी तिरोडा, तहसीलदार तिरोडा, ठाणेदार दवनीवाडा यांना दिलेले तक्रारीनुसार, ६ एप्रिल २०२३ रोजी परसवाडा येथे हनुमान देवस्थान समितीतर्फे सामूहिक विवाह सोहळ्यात तीन बालविवाह

झाल्याची तक्रार पुराव्यासह दिली. तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी सात सदस्यीय चौकशी समिती नेमली. समितीने चौकशी केली. चौकशीत समितीने

चार विवाह झाल्याचे व बालविवाह झाले नसल्याचे सांगितले. मात्र, चौकशी समितीला मिळालेल्या पुराव्यानुसार विवाह सोहळ्यात सात विवाह झाले. त्यापैकी तीन वरांचे वय कमी असल्याने बालविवाह केल्याचे पुढे आले आहे.

दरम्यान, चौकशी समितीच्या अहवालावरून परसवाडाचे ग्रामविकास अधिकारी तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी नितीन बिसेन यांच्या तक्रारीवरून दवनीवाडा पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार समिती पदाधिकारी मुकेश भगत (वय ५४), मनीराम हिंगे (वय ५५), भुवनेश्वर सोनवणे (वय ४७), अरुण मिश्रा (वय ४९), लक्ष्मण तितीरमारे (वय ४९), रमेश येरणे (वय ४६), माणिक ठाकरे (वय ५२), धर्मेंद्र टेकाम (वय ४८), रामलाल मुळे (वय ५८), गजानन ढबाले (वय ४८, सर्व रा. परसवाडा) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.