Manali Zipline Accident : मनालीत रोपवेवरून मुलगी दरीत कोसळली! नागपूरची त्रिशा बिजवे बालंबाल बचावली
esakal June 15, 2025 04:45 PM

नागपूर : मनालीला उन्हाळी सुट्टीसाठी गेलेल्या एक कुटुंब झिपलाइन राईड करत असताना अचानक केबल तुटली. त्यामुळे त्यांच्या लहान मुलीचा ३० फूट खोल दरीत पडून अपघात झाला. या दुर्घटनेत मुलीच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे.

तिच्यावर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संबंधित खासगी कंपनीची निष्काळजीपणा समोर आला आहे. नागपूरचे रहिवासी प्रफुल्ल बिजवे हे आपल्या पत्नी आणि मुलगी त्रिशा यांच्यासोबत उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत मनालीला गेले होते. रविवारी, ८ जून रोजी त्रिशा झिपलाइनवरून एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगराकडे जात असताना अचानक केबल तुटली आणि ती थेट ३० फूट खोल दरीत कोसळली.

यामुळे तिला गंभीर दुखापत झाली पण सुदैवाने तिचा जीव वाचला. पण तिच्या हातापायाला फ्रॅक्चर झाले असून शरीराच्या इतर भागांनाही मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्या आहेत. हा संपूर्ण प्रकार बिजवे दांपत्याने त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रित केला होता. हादरले कुटुंब

कुटुंबियांनी त्रिशाला तत्काळ मनालीतील एका रुग्णालयात घेऊन गेले, पण तिथे योग्य उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे तिला चंदीगडला हलवण्यात आले आणि त्यानंतर नागपूरच्या खासगी रुग्णालयात आणण्यात आले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताबाबत बिजवे कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो होऊ शकला नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.