IND vs ENG: टीम इंडियात मोठा बदल, मुख्य संघात नसलेल्या जलदगती गोलंदाजाला थांबवलं; इंग्लंडविरुद्ध बळ वाढलं
esakal June 16, 2025 04:45 PM

Indian team changes ahead of England Test series

भारत आणि भारत अ यांच्यातली इंट्रा स्क्वॉड मॅच अडीच दिवसांच्या खेळानंतर रविवारी संपली. शुभमन गिल आणि कंपनीचा सराव व्हावा यासाठी या सामन्याचे आयोजन केले गेले होते. २० जूनपासून यांच्यातल्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ त्यासाठीच आता लीड्सच्या दिशेने प्रवास करतील.

भारतीय संघात स्थान नसलेल्या आणि भारत अ संघातील खेळाडू आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत, तर १७ जूनला भारतीय संघ बेकेनहॅम, लंडन येथून लीड्ससाठी प्रवास करणार आहे. इथे पहिली कसोटी होणार आहे. १८ व १९ जून असे दोन दिवस भारतीय संघाच्या सत्राचे आयोजन केले गेले आहे. दरम्यान, भारताचे काही खेळाडू १७ जूनला परतीच्या प्रवासाला लागणार आहेत.

Rev Sportz ने दिलेल्या माहितीनुसार हर्षित राणा ( Harshit Rana) भारतीय संघासोबत लंडनमध्येच थांबला आहे. राणा भारत अ संघाच्या अन्य संघासोबत परतीचा प्रवास करणार नाही. तो भारताच्या वरिष्ठ संघासोबतच थांबला आहे. राणा हा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारतीय संघाचा सदस्य होता, परंतु इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याला १८ सदस्यीय संघात स्थान मिळाले नाही. पण, आता त्याच्या थांबण्याने टीम इंडियाचा काहीतरी बॅक अप प्लान सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, India vs India A intra-squad सामन्यात ८ सत्र खेळवली गेली. आणि लोकेश राहुल यांनी अर्धशतकीय खेळी केली, तर सर्फराज खान व शार्दूल ठाकूर यांनी शतकं झळकावली. गोलंदाजीत मोहम्मद सिरीजला दोन विकेट्स घेता आल्या, परंतु ७ षटकांत तो महागडा ठरला. दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहला एकही बळी टिपता आला नाही. शार्दूलने पहिल्या दिवशी विकेट्स घेतल्या.

भारतीय संघ : शुभमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक/उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू इश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.