वन क्षेत्रात डेब्रिज टाकणाऱ्या डम्परवर कारवाई
esakal June 16, 2025 11:45 PM

उरण, ता. १६ (वार्ताहर) : पनवेलच्या गव्हाण भागात वन क्षेत्रामध्ये डेब्रिजचा भराव टाकणाऱ्या १५ डम्परवर कारवाई करण्यात आली. पनवेलचे सहाय्यक वनसंरक्षक, उरणचे वनपरिक्षेत्र अधिकारी व उरण रेंज स्टाफ यांनी गुरुवारी (ता. १२) कारवाई करीत सर्व डम्पर ताब्यात घेतले आहेत. गव्हाण परिसरातील वन क्षेत्रात बेकायदा डेब्रिज टाकत असल्याची माहिती मिळताच पनवेलचे सहाय्यक वनरक्षक, उरणचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मौजे गव्हाण परिसरातील सर्वे नं. ३५१ व ३५२ या क्षेत्रामध्ये अनधिकृत प्रवेश करून मुंबई, नवी मुंबई परिसरातील डेब्रिज डम्परच्या साह्याने टाकण्यात येत होते. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी डेब्रिज टाकणाऱ्या १५ डम्परवर कारवाई केली. सर्व डम्पर ताब्यात घेऊन ते उरण वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात ठेवण्यात आले आहेत. त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती उरण वनपरिक्षेत्र अधिकारी नथुराम कोकरे यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.