आजकाल जेवण करत असताना मोबाईलचा वापर करणे सामान्य बाब झाली आहे. लहान मुले देखील मोबाईल बघितल्याशिवाय जेवत नाहीत. मात्र हीच सवय आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, जेवताना फोन वापरणे केवळ लक्ष विचलित करत नाही तर ब्लड शुगर आणि वजन वाढण्याचे एक मोठं कारण देखील बनू शकते. जेवणादरम्यान नियमित मोबाइलचा वापर केल्याने शरीरातील इन्सुलिन रेझिस्टन्स पातळीवर परिणाम दिसून येतो. त्यामुळे ही एक चिंतेची बाब समजली जाते.
वजन वाढणे
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा लोक पूर्ण लक्ष देऊन अन्न खात नाहीत तेव्हा ते त्यांच्या शरीरातील भुकेच्या सिग्नलकडे दुर्लक्ष करतात, यामुळे नंतर जास्त आहार घेतला जातो. वजन झपाट्याने वाढायला लागते. अचानक वजन वाढणे देखील आरोग्यासाठी घातक असते.
इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका
जेवताना मोबाईलमध्ये व्यस्त राहिल्याने अन्नाच्या प्रमाणाकडे दुर्लक्ष होते. अशा वेळी एखादी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त खाते. यामुळे जास्त कॅलरीजचे सेवन केले जाते. शिवाय लोक अनेकदा प्रक्रिया केलेले किंवा कमी पौष्टिक अन्न खातात, ज्यामुळे शरीरात ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढू शकते. जर हे वारंवार घडलं तर इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका देखील वाढतो. हे नंतर टाइप २ मधुमेहासारख्या आजारांमध्ये बदलू शकते.
इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय?
इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे शरीरातील पेशींची इन्सुलिनला योग्य प्रकारे प्रतिसाद देण्याची क्षमता कमी होणे. याचा परिणाम म्हणून, रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि मधुमेह किंवा प्री-डायबिटीजसारख्या समस्या उद्भवू शकतात. इन्सुलिन रेझिस्टन्समुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) यांसारख्या समस्यांचा धोका वाढू शकतो.
इन्सुलिन रेझिस्टन्सची कारणे
शरीरातली अतिरिक्त फॅट्स विशेषत: कमरेभोवती असलेले फॅट आणि शारीरिक हालचालींचा अभाव ही इन्सुलिन रेझिस्टन्सची प्राथमिक कारणे आहेत. हाय प्रोसेस्ड कार्बोहायड्रेट खाद्यपदार्थ आणि सॅच्युरेटेड फॅट्स असलेले खाद्यपदार्थ हे यात आणखी वाढ करणारे घटक आहेत. काही औषधं आणि आनुवंशिक गुणधर्मदेखील इन्सुलिन रेझिस्टन्ससाठी कारणीभूत ठरू शकतात. हेल्दी कार्ब्ज, फॅट्स आणि प्रोटीन असलेला आहार घेतल्यास इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होण्यास मदत होऊ शकते. शिवाय मन लावून खाणं ही एक अशी सवय आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती त्याच्या अन्नाच्या प्रत्येक घासाकडे लक्ष देते. ही सवय ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करण्यास मदत करतात.