प्रभाग रचना निर्मितीला वेग
esakal June 17, 2025 11:45 PM

भिवंडी, ता.१६ (बातमीदार) ः राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांची प्रारूप प्रभाग रचना करण्याचे आदेश शासनाच्या नगरविकास विभागाने दिले आहेत. त्यानुसार भिवंडी-निजामपूर शहराचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा तयार करण्यासाठी समिती गठित केली आहे.
भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेची मुदत जून २०२२ मध्ये संपुष्टात आली आहे. राज्याच्या नगरविकास विभागाकडील पत्रान्वये ‘ड’ वर्ग महापालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश भिवंडी महानगरपालिकेला देण्यात आले आहेत. या पत्रासोबतच्या परिशिष्ट अ, परिशिष्ट ब व परिशिष्ट क मध्ये नमूद सूचना तसेच प्रभाग रचनेबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना, न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग रचना नियमातील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे. याच अनुषंगाने महापालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांनी प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्यासाठी एक समिती गठित केली आहे.
--------------------------------------
यांचा समितीत समावेश
समितीच्या अध्यक्षपदी आयुक्त, उपाध्यक्ष म्हणून अतिरिक्त आयुक्त काम पाहणार आहे. तर सदस्य म्हणून उपायुक्त(निवडणूक), सहाय्यक संचालक (नगररचना), नगररचनाकार, शहर अभियंता, सहाय्यक आयुक्त (निवडणूक), निवडणूक विभागप्रमुख, संगणक विभागप्रमुख यांची नियुक्ती केली आहे. तर कार्यालयीन कामासाठी तत्कालीन निवडणूक विभागप्रमुख व लिपिक यांचा समावेश आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.