अजगराच्या विळख्याने करंजगावत भेकराचा मृत्यू
esakal June 18, 2025 01:45 AM

हिर्डोशी, ता. १७ : करंजगाव (ता. भोर) येथे गावाच्या वरच्या बाजूच्या डोंगरावर अजगराच्या विळख्याने भेकराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. १७) सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे.
करंजगाव येथील शेतकरी धोंडिबा मळेकर, संतोष मळेकर हे गावच्या हद्दीतील वडाचा माळ परिसरात शेतात जात असताना एका झुडपाशेजारी अजगराने भेकराला विळखा घातलेले पाहिले. अजगराची लांबी १५ फूट होती. घटना कळताच तातडीने तेथे जमलेल्या ग्रामस्थांनी वन विभागाला कळविल्यावर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोचले. दरम्यान, ग्रामस्थांच्या आवाजाने विळख्यात व तोंडात पकडलेले भक्ष्य (भेकर) सोडून अजगर झाडा झुडपातून डोंगराकडे निघून गेला. मात्र, अजगराच्या विळख्यात भेकराचा मृत्यू झाला. मृत भेकराची वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. त्यानंतर जंगलात निघून गेलेल्या अजगराचा वनविभागाचे कर्मचारी व सर्पमित्र यांच्याकडून शोध घेण्यात आला. परंतु, चार वाजेपर्यंत अजगराचा शोध लागला नव्हता. पुढेही शोधकार्य सुरु होते. अजगर सापडल्यावर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे भोरचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत यांनी सांगितले.
घटनास्थळी वनविभागाचे वनपाल सुग्रीव मुंडे, वनरक्षक समीर जाधव, वनमजूर योगेश कुडले, सर्पमित्र तबरेज खान, धीरज भोंडवे, ग्रामस्थ शंकर मळेकर, प्रदीप मळेकर, विठ्ठल मळेकर, सुनील मोरे, सुहास गायकवाड सह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
अजगराच्या चर्चेने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले असून अजगराला पकडण्याची मागणी होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.