विक्रमगड (बातमीदार) : तालुक्यातील विक्रमगड केंद्रशाळेमध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला. विक्रमगडच्या तहसीलदार चारुशीला पवार, नायब तहसीलदार म्हात्रे, शाळेच्या मुख्याध्यापिका सहारे, सुनील अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेशोत्सव उत्साहात झाला. या वेळी पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे कागदावर उमटवून, त्यांना गुलाबपुष्प देत, तसेच पुष्पवर्षाव करून टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रवेशोत्सवानंतर झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व नवीन पुस्तकांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन गणवेश व नवीन पुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या कार्यक्रमात चारुशीला पवार यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. सुनील अधिकारी यांनी जिल्हा परिषद शाळेचे महत्त्व विशद केले.