दादू : (खट्याळपणाने फोन फिरवत) म्यांव म्यांव…म्यांव म्यांव..!
सदू : (सुप्रसिद्ध खर्जात) बोल दादूराया…मी ओळखला तुझा आवाज!!
दादू : (कौतुकानं) हुशार आहेस! वाघाची डरकाळी मारली तरी ओळखतोस,आणि मांजराचा आवाज काढला तरी बरोब्बर हुडकतोस!!
सदू : (सावधपणाने) फोन कशासाठी केलास? टाळीसाठीच ना?
दादू : (खेळीमेळीने) छे, छे! सहजच केला, ख्यालीखुशाली विचारायला! क्या चल रहा है?
सदू : (अतिसावधपणाने) बरं चाललंय!
दादू : (आणखी खेळीमेळीने) हमारा भी एकदम अच्छा चल रहा है! सध्या आराम चल रहा है!!
सदू : (नाराजीनं) मराठी में बोलो! हिंदी में कायकू बोलता हय?
दादू : (चुटकी वाजत) आलास ना हिंदीवर?
सदू : (किंचित ओशाळून) समोरच्याला कळेल अशा भाषेतच उत्तर द्यावं, हा आमचा खाक्या आहे!
दादू : (उगीचच वाद उकरुन काढत) पण तुमचा हिंदीला इतका टोकाचा विरोध का?
सदू : (थंडपणाने) कारण आम्ही शतप्रतिशत मराठी आहोत म्हणून!
दादू : (मुंबईतल्या हिंदीभाषकांच्या काळजीपोटी…) मी तर हिंदीत भाषणंही करतो! समझा क्या? अपुन को हिंदी का कुछ प्रॉब्लेम नही है…लेकिन सक्ती करेगा तो देख लेगा, हांऽऽ… बोलके रखताय!!
सदू : (जिद्दीनं) शाळांमध्ये तुम्ही हिंदी कशी शिकवता, ते बघतोच आता! सक्ती कराल तर तुमची कंबक्ती भरलीच म्हणून समजा! मी महाराष्ट्रातल्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवलंय- सरकारची ही हिंदी सक्ती चालवून घेता कामा नये!
दादू : (हळूचकन) पण पत्र इंग्रजीत कशाला पाठवलंस? मी वाचलं ते!!
सदू : (कटकटलेल्या सुरात) त्यांना कळेल अशा भाषेत लिहिलं! ते काहीही असो, पण हिंदी ही भाषा मराठी माणसाला न शिकवता येणारी भाषा आहे, उगाच वेळ कशाला घालवता?
दादू : (विचारात पडत) हे खरंय! मी कुठे शिकलो हिंदी, पण बोलू शकतो! हल्ली तर मला इतकी सवय झाली आहे की मनातल्या मनात मैं हिंदी मेंच बोलता हूं …क्या बोलने का? किधरसे शुरु करनेका? बोलने जैसा बहुत है, लेकिन क्या बोलनेका? मै बोलूंगा, बोले तो बोलूंगाच! क्यूं नही बोलूं? किंबहुना बोलनाही पडेंगा! है कोई माई का लाल जो मुझे बोलनेका नै, ऐसा बोलेंगा! जबान खींच लुंगा…न बोलके कैसा चलेगा!
सदू : (चुळबुळत) नको, नको रे! राष्ट्रभाषा नसली म्हणून काय झालं? इतके का हाल करायचे एखाद्या भाषेचे? अं?
दादू : (खुशीत) दुसरं असं की, गद्दार, फितुर, नमकहराम, खोकेवाले, खंजीर…हे सगळे माझे शब्द हिंदीतलेच आहेत! त्यामुळे मला सोप्पं जातं!!
सदू : (निर्विकारपणाने) मी शुद्ध मराठीत हाणतो!!
दादू : (घाईघाईने विषय बदलत) ते जाऊ दे! अपने टाली का क्या करने का? टाली एक हाथ से बजती नहीं, इतना ध्यान में रख्खो!!
सदू : (थंडगार सुरात) कसली टाळी?
दादू : (गोंधळून) अरे, तूच म्हणाला होतास ना, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही दोघंही-
सदू : (उडवून लावत) ते बघू!! आधी लगीन मराठी भाषेचं! हिंदीची सक्ती मी अशी लांब कोलणार आहे की बघच तू!!
दादू : (काळजीच्या सुरात) सदूराया, पण जपून हं! पालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत! एक बोलेगा तो होएगा दुसराच!!
सदू : (डेडली सवाल करत) तुला टाळी मराठीत हवीय की हिंदीत?