कसोटी क्रिकेटमध्ये मागच्या काही वर्षात काही खेळाडूंनी पदार्पण केलं. काही खेळाडू खेळले आणि काही खेळाडूंचं करिअरही एक दोन मालिकेनंतर संपलं. काही जणांचं संघातील स्थान पक्कं झालं आहे. असं असताना एक खेळाडू मात्र संघात आहे. मात्र त्याला पदार्पणाची संधी काही मिळत नाही. मागच्या 4 वर्षांपासून पदार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून अभिमन्यू ईश्वरन आहे. मागच्या काही वर्षांपासून तो संघासोबत आहे. मात्र त्याला संधी काही मिळत नाही. भारताने 2021 मध्ये इंग्लंड दौरा केला होता. त्या दौऱ्यात अभिमन्यू ईश्वरनला पहिल्यांदा सहभागी केलं होतं. मालिकेत काही खेळाडूंना संधी मिळाली, पण अभिमन्यू ईश्वरन वंचित राहीला. यानंतर इतर कसोटी मालिकेतही त्याचं नाव होतं, पण पदार्पणाची संधी काही मिळाली नाही. त्यामुळे अभिमन्यू खऱ्या अर्थाने चक्रव्यूहात अडकला आहे, असंच म्हणावं लागेल.
अभिमन्यू ईश्वरन याचं भारतीय कसोटी संघात सहभाग झाल्यानंतर 15 खेळाडूंचं पदार्पण झालं. यात केएल भरत, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, इशान किशन, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल, आकाश दीप, नितीश कुमार रेड्डी, देवदत्त पडिक्कल, हर्षित राणा, साई सुदर्शन आणि अंशुल कंबोज या खेळाडूंची नावे आहेत. करुण नायरच्या जागी अभिमन्यू ईश्वरनला संधी मिळेल असं वाटत होतं. पण त्याच्या जागी पुन्हा एकदा साई सुदर्शनला जागा मिळाली आहे. त्यामुळे अभिमन्यू ईश्वरनचं कसोटी क्रिकेट असंच संपेल अशी भीती क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत.
अभिमन्यू ईश्वरने आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये 103 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. यात त्याने 48.70 च्या सरासरीने 7841 धावा केल्या आहेत. यात 27 शतकं आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम खेळी ही 233 धावांची आहे. इतकंच काय तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर दोन विकेटही आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये 89 सामन्यात 47.03 च्या सरासरीने 3857 धावा केल्यात. यात 149 ही सर्वोत्तम खेळी आहे. यात त्याने 9 शतकं आणि 23 अर्धशतकं ठोकली आहेत.