पुणे : जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावरून मोरगावच्या दिशेने वेगाने जाणार्या एका स्वीफ्ट कारने बुधवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास जेजुरीतील किर्लोस्कर कंपनीजवळ पिकअप टेम्पोला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात एका महिलेसह 7 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर दोन लहान मुलांसह 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना जेजुरीतील किर्लोस्कर कंपनीजवळ घडली आहे. अपघातानंतर जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (8 people including a woman died in a horrific accident on the Jejuri-Morgaon road in Pune district)
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम ढाब्याचे मालक सोमनाथ रामचंद्र वायसे हे त्यांच्या ढाब्यासाठी फ्रीज डिलिव्हरी पिकअपमधून खाली उतरवण्याचे काम सुरू होते. याचवेळी मोरगावच्या दिशेने वेगाने जाणार्या एका स्वीफ्ट कारने किर्लोस्कर कंपनीजवळ पिकअप टेम्पोला जोराची धडक दिली. जोरदार धडक दिल्यानंतर कार टेम्पोशेजारील आणखी एका कारवर आदळली. या भीषण अपघातात टेम्पोमधील वस्तू खाली करणारे दोघेजण, श्रीराम ढाब्यासमोर उभे असणारे तिघे जण आणि कारमधील तिघे अशा 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. त्याशिवाय 2 लहान मुले, 1 महिला, 2 पुरुष असे 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
हेही वाचा – Jayant Patil : पक्षांतरासाठीच भेटलो असेल…; भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अपघातग्रस्त पीडितांना तातडीने रुग्णालयात हलवले असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी जेजुरी पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, सोमनाथ रामचंंद्र वायसे, रामू संजीवन यादव (दोघेही रा. नाझरे कप, ता. पुरंदर), अजय कुमार चव्हाण (रा. उत्तर प्रदेश), अजित अशोक जाधव (रा. कांजळे, ता. भोर), किरण भारत राऊत (रा. पवारवाडी, ता. इंदापूर), अक्षय शंकर राऊत (रा. झारगडवाडी, ता. इंदापूर), अश्विनी शंकर ऐसार (रा. नागनसूर हेद्रे, सोलापूर) अशी मृतांची नावे असून अन्य एकाची ओळख पटू शकली नाही.
हेही वाचा – Bharat Gogawale : राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांकडून गोगावलेंचा व्हिडीओ पोस्ट; पालकमंत्रिपदाचा केला उल्लेख