ढिंग टांग : सलीम लंगडे पे मत रो…!
esakal June 20, 2025 12:45 PM

टु हूम सो एव्हर इट मे कन्सर्न-

कमळ पार्टी, वाशिंग डिपार्टमेंट.

डिअरम डिअर साहेब, यक निरालीच रिक्वेष्ट करनेसाठी सदरील लेटर लिवतांव. मी साधाशिंपल सोशल वर्कर असून सद्या फाकिस्तानात रवतांव. पण मला इंडियात वापिस यायचा हा. काय क्राव?

आपन सध्या पाकिस्ताना शेटल असून कराचीमधी चांगल्या आठधा रुमचा बंगला आहे.

स्विमिंग पूल, बार्बेक्यू, शिनेमा, सगळे एकदम टकाटक आहे. काहीही हयगय नाही. पूर्वी मी बॉम्बेत डोंगरी एरियात राहात होतो. तिथेही आपली चांगली वट होती. पन आता उमर झाली. आता इंडियात वापस येन्याची लई सय येत आहे. क्रुपया गाइडन्स करावी.

साहेब, सलीम कुत्ता नावाचा आपला एक व्हॉलंटिअर आहे. कत्रुत्ववान आहे. पब्लिकमध्ये त्याची चांगली उठबस आहे. तुम्ही इच्याराल का, त्याचे नाव सलीमकुत्ता असे का? तर कुत्ता हा इमानदार असतो, तसाच सलीम पन इमानदार आहे. तसे आपले अनेक व्हॉलेंटिअर इंडियात, बॉम्बेत काम करत असतात.

सलीम कंघी, बाबू हटेला, राजू घंटा, बबलू वडापाववाला, छज्जू गॅरेजवाला, अयूब बैदा…अशी किती नावे घेऊ? सामाण्य पब्लिकला लुबाडून गबरगंड होणारे बिल्डर, फालतू पिच्चर काढून पब्लिकला पागल करणारे शिनेमा प्रोडुसर अशा बेकार लोकांना दाबात ठेवून आमचे व्हॉलटिअर त्यांच्याकडून दंड वसूल करतात, आणि त्यांना लायनीत ठेवतात. यापैकी बऱ्याच लोकांचा सुपाऱ्यांचा धंदा आहे. सुपारीच्या धंद्यात बरकत चांगली येते. माझा पन सुपारीचा छोटामोठा धंदा आहे.

सलीम कुत्ता गेले काही दिवस तो मला इंडियात बोलवत होता. मी त्याला म्हणायचो की, ‘क्या रख्खा है, इंडिया में? इधर फाकिस्तान में सब मस्त हय!’ तर तो बोलला की, ‘भाई, गलत फहमी है तुम्हारी! इंडिया में अब्बी माहौल इतना भारी है की उसके सामने मलेशिया भी कचरा हो गएला है!! इधरकू आजाव, आपुन राज करेंगे, सत्ते पे सत्ता!’

सत्ता बोला तो लंगडा! (पत्ते खेळता का?) मी सलीमला बोललो, ‘‘सलीम, लंगडे पे मत रो! मैं लेटर लिखता, डिटेल देना!’

सलीम कुत्ता बोलला की इकडे एका पोलिटिकल पार्टीकडे वॉशिंग मशीन असून त्यात काहीही बेदाग होऊन, इस्तरी-बिस्तरी करुनच भायेर येते!! मी हैरानच झालो!

इंडियात येयाचा. वाशिंगमशीनमधी जाऊन पडायचा, ढक्कन खोलले का बेदाग मानूस हाज्जिर!! ये है कुदरत का करिश्मा…कालपरेंत मला घसीटत नेऊन अरबी समुद्रात बुडवणारेच आता वॉशिंग मशीनमधी घालणार या कल्पनेनेच मी तीन- चार सुपाऱ्या फोडल्या.

साहेब, आपल्या पार्टीकडे असे तिलिस्मी वॉशिंग मशीन आहे, अशी टिप मला आमच्या एका खबरीने दिली. (अंडरवर्ल्डमधल्या खबरी देणारे टिपर पोलिसांकडे असतात, तसे आमच्याकडेही असतात. जाने दो.) मला एकवार चान्स भेटला तर मी बेदाग होऊन पार्टीचे इमानदारीत काम करीन. साहेब, गलती कुनाच्या हातून होत नाही? इन्सान है तो गलती होणारच. मी पण थोड्या फार गलत्या केल्या.

पण माझ्यावर अजून गुन्हा सिद्ध झाला नाही. अदालतमध्ये तीनशेदोन, तीनशेचार वगैरेच्या केसेस चालू आहेत. पण अजून शिध्द कुठे झाले? याचा अर्थ वॉशिंग मशीनसाठी मी एकदम करेक्ट माणूस आहे. मी व माझे तीनशे-चारशे व्हॉलंटिअर (यात काही पोलिटिशन पण असतील) वॉशिंग मशीनमध्ये जंप मारुन बेदाग झालो की तुम्ही आम्हाला पार्टीत घ्याल का? इंतजार में. आपका अपना दाऊद ऊर्फ डॉन.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.