Iran Israel War: इराणचा आक्रमक पवित्रा, इस्रायलच्या बड्या शहरावर मिसाईल अटॅक, सगळीकडे जाळ अन् धूर
GH News June 20, 2025 10:07 PM

इराण आणि इस्रायलमधील युद्ध आणखी तीव्र होताना दिसत आहे. दोन्ही देशांकडून हवाई हल्ले सुरु आहेत. इस्रायली सैन्याच्या हल्ल्यांना इराणने प्रत्युत्तर दिले आहे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने असा दावा केला आहे की, इराणने बेअरशेबा शहरावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले आहे. सोरोका रुग्णालय या क्षेपणास्त्राच्या निशाण्यावर होते. या रुग्णालयाती ज्यू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि अरब बेदुइन समुदायातील लोक उपचार घेत आहेत. यावर इराणने हल्ला केला आहे. यात काही लोक जखमी झाले आहेत.

इराणचा बेरशेबा शहरावर हल्ला 

इराणने बेरशेबा शहरावर केलेल्या या हल्ल्यात इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, हे क्षेपणास्त्र मायक्रोसॉफ्ट ऑफिसजवळ पडले. यामुळे अनेक गाड्यांना आग लागली, यामुळे सगळीकडे धूर पसरला होता. तसेच जवळील घरांचेही नुकसान झाले आहे. यामध्ये 6 जण जखमी झाले आहेत. बेअरशेबा शहरावर क्षेपणास्त्र हल्ला होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. याआधी गुरुवारी इराणने या शहरावर हल्ला केला होता, यात 50 हून अधिक लोक जखमी झाले होते.

न्यूयॉर्क टाईम्सच्या एका वृत्तानुसार, इराणकडे अण्वस्त्रे बनवण्याची पूर्ण क्षमता आहे असं अमेरिकेला वाटत आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी सांगितले की, ‘जर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी आदेश दिला तर इराण काही आठवड्यात अण्वस्त्र बनवू शकतो. कारण इराणकडे अण्वस्त्रे बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहेत. आता त्यांना फक्त आदेशीची गरज आहे. जर इराणने अण्वस्त्र बनवले तर ते केवळ इस्रायलच नव्हे तर अमेरिकेसह संपूर्ण जगाच्या सुरक्षेला धोका निर्माण करेल.’

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

दरम्यान, गेल्या 7 दिवसांपासून या दोन देशांमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धात आतापर्यंत 24 इस्रायली मारले गेले आहेत, तसेच 600 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्याचबरोबर युद्धामुळे इराणमध्ये मृतांची संख्या आता 657 वर पोहोचली आहे आणि 2037 लोक जखमी आहेत. आता हे युद्ध थांबले नाही तर आगामी काळात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.