Adani Group: इराण-इस्रायल युद्धामुळे अदानींचे मोठे नुकसान; एका दिवसात बुडाले 100000000000 रुपये, शेअर्समध्ये मोठी घसरण
esakal June 20, 2025 10:45 PM

Adani Ports shares fall: ईरान आणि इज्रायलमधील युद्धसदृश परिस्थितीचा फटका उद्योगपती गौतम अदानी यांना बसला आहे. त्यांच्या अदानी पोर्ट्स या कंपनीचे शेअर मागील 10 दिवसांमध्ये तब्बल 10 टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे अदानी यांच्या एकूण संपत्तीतही मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 10 हजार कोटी रुपयांनी त्यांची नेटवर्थ घसरली आहे.

हाइफा पोर्टमध्ये अदानींची मोठी गुंतवणूक

या संपूर्ण घडामोडीमागे एक महत्त्वाचं कारण आहे – इज्रायलमधील हाइफा पोर्ट. हेच पोर्ट अलीकडे ईरानच्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या केंद्रस्थानी होते. अदानींनी जानेवारी 2023 मध्ये इज्रायलच्या गैडोट ग्रुपसोबत मिळून हाइफा पोर्टमधील 70 टक्के हिस्सा विकत घेतला होता. हा करार जवळपास 1.18 अब्ज डॉलरला झाला होता. हाइफा पोर्टचा इज्रायलच्या एकूण आयातीत 30 टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे.

गुंतवणूकदार चिंतेत

जरी हाइफा पोर्टवर प्रत्यक्षात काही हल्ला झाला नसला, तरीही युद्धजन्य परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यांना वाटतं, की हाइफा पोर्टवर जर हल्ला झाला, तर तिथलं कामकाज ठप्प होऊ शकतं आणि त्यामुळे अदानी पोर्ट्सला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. हीच भीती गुंतवणूकदारांनी शेअर विक्रीच्या रूपात व्यक्त केली, आणि त्यामुळे शेअरचे भाव घसरले.

किती घसरले शेअर?

10 जूनला अदानी पोर्टचा शेअर 1473.80 रुपयांवर बंद झाला होता. त्यानंतर घसरण होत आहे. आज शुक्रवारी हा शेअर 1336.80 रुपयांवर उघडला, आणि तो 1334.80 रुपयांपर्यंत घसरला. म्हणजेच 10 दिवसांत जवळपास 10 टक्के घसरण झाली.

अदानींच्या संपत्तीत किती घट?

शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा थेट परिणाम अदानींच्या संपत्तीवरही दिसून आला. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार, अदानी यांची संपत्ती 24 तासांत सुमारे 1.19 अब्ज डॉलरने, म्हणजेच 10,310 कोटी रुपयांनी कमी झाली आहे. तरीही अदानी सध्या 79.2 अब्ज डॉलरच्या नेटवर्थसह जगातील 20व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.