विश्रांतवाडी - श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे विश्रांतवाडी परिसरात आगमन होताच भाविक भक्तांच्यावतीने पालखीचे भक्तिमय वातावरणात व जल्लोषात स्वागत करण्यात आले. विविध राजकीय पक्षाच्या वतीने परिसरात स्वागताचे फ्लेक्स उभारण्यात आले होते. लष्कराच्या वतीने वारकर्यांना फळ व पाणीवाटप करण्यात आले. परिसरात खेळणी, झोके व्यावसायिकांनी थाटल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
पालखी सोहळ्यानिमित्त विविध संस्थांच्या, संघटनांच्या वतीने वेगवेगळे उपक्रम घेण्यात आले. सुरेंद्र पठारे वैद्यकीय सहायता कक्षाच्या वतीने वारकर्यांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. याचे आयोजन सुरेंद्र बापूसाहेब पठारे यांनी केले.
माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सतीश, म्हस्के यांच्यावतीने पालखीचे स्वागत करून वारकर्यांना फराळवाटप, आरोग्य तपासणी, औषधवाटप करण्यात आले. मराठी शाळेतील विद्यार्थ्यांकडून सामूहिक हरिपाठ वाचन उपक्रम घेण्यात आला.
विशेष मान्यवर पाहुण्यांचा सन्मानही करण्यात आला. उपक्रमाचे हे 20 वे वर्ष आहे. धानोरी येथील सामर्थ्य जनशक्ती संघटनेच्या वतीने पाणीबाटल्या, बिस्कीट व फराळवाटप करण्यात आले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ मानेपाटील, स्वप्नील मानेपाटील व सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
विद्यानगर येथील चंद्रकांत जंजिरे प्रतिष्ठान, येरवडा डॉक्टर्स असोसिएशन व विश्रांतवाडीतील केदारनाथ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत औषधवाटप व आरोग्यतपासणी शिबिर घेण्यात आले. यात डॉ. एन. एल. पाटील, डॉ. रायचंद आढाव, डॉ. व्हि. एल. भुजाडी, डॉ. शीतल घोडके, डॉ. अजित केळकर, डॉ. हितेश सोळंकी, डॉ. आशीष गोयल आदींनी सहभाग घेतला.
यावेळी वारकर्यांची रक्तदाब, रक्तशर्करा तपासणी, नेत्रतपासणी आदी विविध तपासण्या करण्यात आल्या व फराळवाटप करण्यात आले. डॉ. प्रमोद सातपुते, डॉ. रवींद्र किवळकर, चंद्रकांत जंजिरे व शामा जाधव आदींनी या शिबिराचे आयोजन केले होते.
यादरम्यान पोलिसांच्यावतीने या मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. येरवडा, खडकी, संगमवाडी या भागाकडे जाणारे मार्ग पोलिसांच्या वतीने बंद करण्यात आले होते.
दुपारी फुलेनगर येथील दत्त मंदिरात श्रींची पालखी विसाव्यास थांबली असताना दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी दत्त मंदिर ट्रस्टचे व माजी नगरसेविका शीतल सावंत, अजय सावंत यांच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले.