राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या युतीबाबत चर्चा सुरु आहे. अशातच आता या युतीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज आमदार खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे विधान केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
युती होईल किंवा…
उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाच्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मनसेसोबतच्या युतीबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी, मनसेसोबतच्या युती बाबत स्थानिक वातावरणाची चाचपणी करा असं उद्धव ठाकरे यांनी आमदार-खासदारांना सांगितले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी युती होईल किंवा नाही मात्र एकट्याने लढण्याची तयारी ठेवा असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीकडे लक्ष द्या…
उद्धव ठाकरे यांनी आमदार-खासदारांना मार्गदर्शन करताना, आगामी पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना कसं कोंडीत पकडायचं याबाबतही माहिती दिली. तसेच मुंबई महापालिका निवडणुकीकडे लक्ष केंद्रित करा. त्या अनुषंगाने पक्षबांधणी करुन कामाला लागा. युती होईल किंवा होणार नाही, मात्र एकट्याने लढण्याची तयारी ठेवा असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
अंबादास दानवे काय म्हणाले?
आमदार-खासदारांच्या बैठकीनंतर बोलताना अंबादास दानवे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. दानवे यांनी म्हटले की, ‘काल शिवसेनेचा वर्धापन दिवस होता आणि आज संघटनात्मक बैठक होती आणि सर्वच आमदार खासदार मुंबईत होते. येत्या काळात विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आहे. या अधिवेशनाची पूर्वतयारी झालेली आहे.’
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा का सुरु झाली?
चित्रपट अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत राज यांनी मनसे-शिवसेनेच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना राज यांनी, ‘एकत्र येऊन राहणे मला कठीण वाटत नाही. महाराष्ट्रातील मराठी लोकांच्या अस्तित्वासाठी आमचे वाद आणि भांडणे खूपच लहान आहेत’ असे विधान केले होते. तेव्हापासून या युतीची चर्चा सुरु झाली.
यानंतर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया देताना, ‘मी छोटे छोटे वाद बाजूला ठेवण्यास तयार आहे, महाराष्ट्रातील लोकांना जे हवे आहे ते होईल’ असं म्हटलं होतं. त्यामुळे या युतीच्या चर्चांना अधिक जोर आला. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या काही नेत्यांच्या कार्यक्रमांमध्ये भेटीगाठीही झाल्या. मात्र अजून युतीचा निर्णय अंतिम झालेला नाही.