गौरी देशपांडे- gaurisdeshpande1294@gmail.com
कसोलीच्या पुढे उभा होता बिबट्या! अचानक कुठून तरी तो नेमका तिच्याच समोर कसा टपकला होता कुणास ठाऊक! आता आली का पंचाईत! कसोली भीतीने जागीच गोठून गेली. भीती तर वाटणारच ना! कारण, कसोली होती एक छोटी खवल्या मांजर. तिला तसं एकटीलाच राहायला आवडायचं. तिच्या लांबुडक्या तोंडावरून, अंगभर असलेल्या मोठ्या मोठ्या खवल्यांवरुन, एकूणच तिच्या दिसण्यावरून तिला सगळे प्राणी चिडवायचे. तिला फारसे मित्रही नव्हतेच, पण म्हणून कसोली खूप दुःखी-कष्टी होती असं नाही हं! ती तिचं आयुष्य शांतपणे जगत होती.
एक गोष्ट जी कसोलीला खूप आवडायची - ती म्हणजे वाळव्या! अहाहा! चविष्ट वाळव्या. रोज सूर्य मावळू लागला की ती वाळव्या शोधायला जंगलात जायची. हो! ती निशाचर होती न! एके संध्याकाळी कसोली निघाली वाळव्यांच्या शोधात आणि -
‘‘ए खवलेवाली, काय चाललंय?’’ घुबडानं चिडवलं.
‘‘अंगभर खवले? शीऽऽऽ! किती कुरूप!’’ मोर तुच्छतेने म्हणाला.
‘‘ही ही ही! ही पाहा चालली बोळकी!’’ कोल्हा कुचकटपणे म्हणाला.
कसोली आपली शांतपणे सगळ्यांकडे दुर्लक्ष करत वाळव्यांच्या वासाच्या दिशेने पुढे पुढे चालत राहिली आणि एका वारुळाजवळ येऊन पोहोचली. तसं तर नेहमी ती तिच्या मजबूत नखांनी वारूळ फोडायची, पण आज तिला का कोणास ठाऊक असं वाटलं की, काही तरी वेगळं करून बघूया. वेगळं म्हणजे, तिला बघायचं होतं की, वारुळ न फोडता तिची जीभ किती लांब जाऊ शकते ते! तिने वारुळतल्या एका भोकात तोंड खुपसलं, पण ते फारच छोटं होतं. मग तिने दुसरं भोक निवडलं. तेही लहानच होतं. आता?
‘जरा जोर लावला तर तोंड आत खुपसता येईल’ असा विचार करून तिने मुसंडी मारत त्या भोकात तोंड घातलं आणि क्या बात! केवढ्या तरी वाळव्या तिच्या लांब जिभेला चिकटल्या. त्या मेजवानीवर ताव मारत तिने तोंड अजून आत नेलं आणि मनसोक्त जेवण केलं. मग जरा ‘ब्रेक’ घ्यायचा म्हणून डोकं वर करायला गेली तर काय! तिचं डोकं वारुळात पूर्णपणे अडकलं होतं!
बापरे! आता! तिची घाबरगुंडी उडाली. तिनं मदतीसाठी हाका मारल्या, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
तिला आठवलं तिच्या आईचं वाक्य.
‘‘संकटात सापडल्यावर शांत डोक्याने विचार करायचा.’’ मग तिने जरा विचार केला आणि नखांनी वारुळ फोडायचा प्रयत्न केला. त्यामुळे लहान लहान ढेकळं तुटून खाली पडली. त्यानंतर तिने तिचं डोकं जोरजोरात हलवायला सुरुवात केली, ज्यामुळे वारुळाचा एक मोठा तुकडा खाली पडला आणि शेवटी कसोलीचं डोकं सहीसलामत बाहेर आलं! तिनं सुटकेचा निश्वास टाकला आणि पुन्हा कधीच असा हावरटपणा करायचा नाही असं ठरवून ती घरी जायला निघाली! पण.. पण एक मोठं संकट तिची वाट पाहत होतं. ती घरी जायला वळली तेव्हा अचानक जंगलातली शांतता भंग पावल्याचं तिला जाणवलं. पक्ष्यांचा थवा उडू झाला, प्राणी सैरावैरा पळू लागले. कसोलीसुद्धा घाबरून पळायला लागली. पण खूपच उशीर झाला होता.
कसोलीच्या पुढे उभा होता बिबट्या! कसोली भितीने जागीच गोठून गेली. सगळं जंगल स्तब्ध झालं होतं. आता पुढे काय होणार हे पाहायला घुबड, नाग, मोर, कोल्हा, हरणं सगळी श्वास रोखून थांबली होती. बिबट्या कसोलीवर झडप घालणार इतक्यात कसोली गायब होऊन तिच्या जागी एक चेंडू दिसत होता. हे कसं झालं?
बिबट्याने जवळ जाऊन पाहिलं, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, चेंडू नाही काही, स्वतःच्या शरीराचं मुटकुळं करून बसलेली कसोलीच आहे ती! तो चेंडू तोंडात पकडण्यासाठी म्हणून बिबट्याने मोठ्ठा आ केला आणि टण्ण झालं! बिबट्याचे दात कसोलीच्या खवल्यांमध्ये घुसूच शकले नाहीत, उलट ते दुखावले. मग बिबट्याने त्या चेंडूला जोरदार लाथ मारली, पण ते मुटकुळं काही उलगडलं गेलं नाही.
मग बिबट्या त्या मुटकुळाजवळ गेला आणि त्याने जोरात डरकाळी फोडली, तेव्हा तर त्या चेंडूने घाणेरड्या वासाची एक पिचकारी सोडली. तो उग्र घाण वास बिबट्याला अजिबात सहन झाला नाही आणि तो हार मानून तिथून दूर निघून गेला.
कसोलीची ही गोष्ट लिहिलीय शर्मिला देव यांनी. सगळ्या प्राण्यांच्या चेहऱ्यावरचे भाव सुंदरपणे चितारलेत निलोफर वाडिया यांनी. याचा मराठी अनुवाद रमा हर्डीकर- सखदेव यांनी केला असून, ज्योत्स्ना प्रकाशनाने हे पुस्तक आपल्या भेटीला आणलंय.
कसोलीच्या रूपाला नावं ठेवणारे सगळे प्राणी आ वासून कसोलीची करामत पाहत होते. आता त्या सगळ्यांचेच सूर बदलले आणि ते चक्क तिचं कौतुक करू लागले!
‘‘भयंकर वास सोडण्याची तुझी ट्रिक काय भारी होती गं!’’ कोल्हा खिदळत म्हणाला.
‘‘शरीराचा चेंडू बनवायची आयडिया फारच कमाल!’’ घुबड म्हणालं.
नागालाही वाटून गेलं की, आपल्या अंगावर खवले असते, तर आपणही मुंगूसला चांगला धडा शिकवू शकलो असतो. मोराने तर आपल्या अंगाचं मुटकुळंही करून पाहायचा प्रयत्न केला पण छे! मोठ्या पिसाऱ्याचा पसारा गुंडाळणं शक्यच नव्हत! बाह्यसौंदर्यापेक्षा अंगी असलेले गुण, कौशल्य आणि स्वभावच महत्त्वाचा असतो, हेच कसोलीच्या गोष्टीवरून पुन्हा सिद्ध झालं.
‘‘तू जरा पुट ऑन केल्यासारखं वाटतंय ग!’’
‘‘जरा काळवंडल्यासारखी वाटतीयेस!’’
‘‘काहीतरी खात जा! हवेने उडून जाशील!’’
अशी अनेक वाक्ये आपल्याला ही गोष्ट वाचताना आठवतात. किती वेळा ऐकतो आणि म्हणतोसुद्धा आपण ही वाक्य! या ऐवजी -
Akola Crime : हॉर्नच्या वादातून युवकाची हत्या; मस्तानी चौकात चाकूहल्ला, दोघे गंभीर जखमी ‘‘तू कशी आहेस?’’ ‘‘काम कसं सुरू आहे?’’‘‘नवीन काय शिकते आहेस?” अशा वाक्यांची देवाण-घेवाण जास्त आदराची, आपुलकीची आणि संवेदनशील होईल, नाही का? अर्थात, कसोलीने अजून एक गोष्ट शिकवली, ती म्हणजे- आपल्याला अशा वाईट टिपण्ण्यांचा सामना करावा लागला, तर त्याकडे सरळ दुर्लक्ष करणे आणि त्यासाठी आपल्या क्षमतांची जाणीव असणे!
कसोलीवर जसा नकारात्मक शेरेबाजीचा परिणाम झाला नाही, तसाच कौतुकाचाही झाला नाही! एवढं धाडस दाखवल्यावर आता परत भूक लागली होती आणि ती निघाली होती वाळव्यांच्या नव्या वारुळाच्या शोधात!