- अविनाश साबापुरे
यवतमाळ - दिवाळी तशी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येते. पण सोमवारी (ता. 23) विदर्भातील 20 हजारांवर गावात दिवाळी नसतानाही दिवाळीसारखा उत्सव झाला. निमित्त होते चिमुकल्यांच्या शाळा प्रवेशाचे; पण त्यांच्या स्वागतासाठी सारा गावच हरखून गेल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
विदर्भातील शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी गावागावात मंत्र्यांपासून तर जिल्हाधिकार्यांपर्यंतचे अधिकारी पोहोचले. त्यामुळे यंत्रणाही गावात पोहोचली. गावकर्यांना तर कोण आनंद झाला! विशेष म्हणजे दिवाळीसारखीच घरोघरी नव्या कपड्यांची चंगळ झाली.
पोरांना शाळेतून नवे गणवेश मिळाले, नवे बुट मिळाले अन् बाबांनी त्यात स्वत:च्या खिशातून भर घातली होती. गेल्या आठ दिवसांपासून तालुक्याच्या बाजारपेठेतही दिवाळीसारखी वर्दळ वाढली होती. त्यात शेतीसाहित्य खरेदीसोबतच शालेय साहित्याच्या खरेदीला जोर आला होता. पाऊस नव्हता तरी पोरांसाठी छत्री, रेनकोटचीही खरेदी झाली.
सोमवारी सकाळपासून गावात सजविलेल्या बैलबंडीसह मिरवणुका निघाल्या. त्यात विद्यार्थीतर होतेच; पण सारा गावही आनंदाने सामील झाला होता. बैलबंडीत बसलेल्या पोरांकडे पाहात त्यांचे वडील पुढे फटाके फोडत होते. मिठाई वाटत होते. ही अनोखी ज्ञानदिवाळी विदर्भाच्या अकराही जिल्ह्यांनी मनमुराद साजरी केली. तर मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी असे अनेक जण पाहुणे म्हणून आले अन् या सोहळ्याचे साक्षीदार झाले.
बघा, इथे झाला प्रवेशोत्सव
जिल्हा : शाळा
अकोला : 1377
अमरावती : 2378
भंडारा : 1120
बुलडाणा : 2002
चंद्रपूर : 2003
गडचिरोली : 1733
गोंदिया : 1340
नागपूर : 2584
वर्धा : 1209
वाशीम : 1105
यवतमाळ : 2748
एकूण : 19,599
पावसाची करुणा भाकली
प्रत्येकच शाळेने अनोख्या पद्धतीने शाळेचा पहिला दिवस साजरा केला. पण विदर्भात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे जवळा इजारा गावातील शेतकर्यांची मुले पहिल्या दिवशी शाळेत येताच त्यांनी पावसासाठी करुणा भाकली. पारंपरिक पद्धतीने कमरेला लिंबाचा पाला बांधून त्यांनी ‘भावईचा देव आला कोर कोर’ हे पारंपरिक गीत म्हणत नृत्य केले अन् पावसाला येण्याची विनवणी केली.