भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु असून 24 जून हा या सामन्याचा शेवटचा दिवस आहे. भारताने दुसऱ्या डावात 364 धावांची खेळी आणि पहिल्या डावातील 6 धावांच्या आघाडीसह 370 धावा केल्या. तसेच विजयासाठी 371 धावांचं आव्हान दिलं आहे. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने बिनबाद 100 धावा केल्या आहेत. त्यामुळे हा सामना इंग्लंडच्या बाजूने झुकलेला दिसत आहे. भारतीय गोलंदाज विकेटसाठी धडपड करताना दिसत आहे. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याला देखील विकेट मिळताना दिसत नाही. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये अस्वस्थता वाढली आहे. दुसरीकडे, पाचव्या दिवशीचा खेळ सुरु झाला तेव्हा दोन्ही संघाचे खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून उतरले होते. पहिल्या दिवशी अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली देण्यासाठी हाताला काळी पट्टी बांधली होती. पण पाचव्या दिवशी काय झालं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचं कारण असं की माजी क्रिकेटपटूचं निधन…
23 जून रोजी भारताचा माजी फिरकीपटू दिलीप दोषी यांचं निधन झालं. लंडनमध्येच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. याबाबतची माहिती बीसीसीआयने अधिकृत सोशल मिडिया खात्यावर दिली आहे. दिलीप दोषी यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन्ही संघाचे खेळाडू पाचव्या हाताला काळी पट्टी बांधून उतरले होते. सामन्याच्या तिसऱ्या दिवशीही दोन्ही देशाचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले होते. तेव्हा इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू डेविड सिड लॉरेंस यांचं निधन झालं होतं. पहिल्या कसोटीत दोन्ही संघाचे खेळाडू तीन वेळा काळी पट्टी बांधून उतरले होते.
दिलीप दोषी यांनी भारतासाठी 33 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 114 फलंदाजांना तंबूत पाठवलं आहे. यासह त्यांनी 15 वनडे सामन्यात 22 विकेट घेतल्या आहेत. भारतीय संघात त्यांनी 1979 मध्ये पदार्पण केलं होतं. तसेच 1982 मध्ये शेवटचा सामना खेळला होता. छोट्या करिअरमध्ये त्यांनी भारतासाठी चांगली कागमिरी केली होती.