डास प्रतिबंधासाठी महापालिकेची कारवाई
esakal June 25, 2025 12:45 AM

पिंपरी, ता. २४ : डेंगी, मलेरिया या आजारांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आरोग्य विभागातर्फे घरे, कंटेनर, भंगार साहित्य दुकानांची तपासणी, औषध फवारणी, तसेच अन्य उपाययोजना करण्यात येत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे. आतापर्यंत १२२ आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करुन ३ लाख ३६ हजार इतका दंड आकारण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागाची डेंगी, मलेरिया आणि इतर डासजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी विशेष बैठक पार पडली. यात आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका सध्या डासांची उत्पत्ती रोखण्याची विशेष मोहीम राबवत आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे व उपायुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेअंतर्गत नागरिकांमध्ये जागृती करण्यासोबतच सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे, अये सांगण्यात आले.


आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत करण्यात आलेली कारवाई

घरांची तपासणी : एकूण १ लाख ८४ हजार १०६ घरांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ३ हजार ७९ घरांच्या परिसरात डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याचे आढळून आले.
कंटेनर तपासणी : ९ लाख ५६ हजार ४१८ कंटेनरपैकी ३ हजार ४०१ कंटेनरमध्ये डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याचे आढळून आले.
भंगार साहित्य दुकाने : ४४२ दुकानांची तपासणी करण्यात आली.
बांधकाम स्थळे : ६९७ बांधकाम स्थळांची तपासणी करून त्यामध्ये अस्वच्छता व पाणी साचल्याचे निदर्शनास आले.
नोटीस व दंड : १ हजार २९२ ठिकाणी नोटीस बजावण्यात आल्या. १२२ नागरिक व आस्थापनांवर थेट दंडात्मक कारवाई करुन ३ लाख ३६ हजार दंड रक्कम वसूल करण्यात आली.

डेंग्यू प्रतिबंधासाठी जनजागृती उपक्रम
- नियमित औषध फवारणी
- घरोघरी माहिती पत्रके वाटप
- शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
- स्थानिक पातळीवर जनजागृती
- सार्वजनिक स्वच्छता मोहीम

पावसाळी वातावरणात डासांच्या उत्पत्तीला आळा घालण्यासाठी छतावरील पाण्याच्या टाक्या, ड्रम, कुंड्या, टायर, वापरात नसलेली भांडी या ठिकाणी पाणी साचू देऊ नये. आठवड्यातून एकदा ड्राय डे पाळावा आणि स्वच्छता ठेवावी. महापालिकेमार्फत नियमित औषध फवारणी केली जात आहे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग विविध उपाययोजना करत आहे. नागरिकांनी आपले घर व परिसरात डासांची उत्पत्ती होण्यास प्रतिबंध घालावा. वारंवार सूचना देऊनही अंमलबजावणी होत नसेल तर होणाऱ्या दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागेल.
- सचिन पवार, उपायुक्त, आरोग्य विभाग

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.