ढिंग टांग : हटाव हिंदी, हटाव चिंधी..!
esakal June 27, 2025 01:45 PM

दादू : (बंधुप्रेमाचा उमाळा दाटून येत) म्यांव म्यांव…पर्रर्रर्र..!

सदू : (नेहमीच्या विनम्रतेने) ए, कोणॅय?

दादू : (खेळीमेळीने) सदूराया, आज माझा आवाज ओळखला नाहीस? कशी केली एका माणसाची गंमत!

सदू : (घुश्शात) म्यांव म्यांव ही आमची भाषा नव्हे! आमची भाषा मराठी!!

दादू : (अजूनही खेळीमेळीने) मीही मराठीतच म्यांव म्यांव केलं!

सदू : (गंभीरपणाने) हे पहा, मी भयंकर सीरिसस मूडमध्ये आहे! टोमणे, विनोद वगैरे काहीही नको!! आत्ताच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे माझ्याकडे येऊन गेले…

दादू : (कडूझर चेहरा करत) गद्दारांचं नाव घेऊ नकोस! कशाला कडमडले होते ते?

सदू : (मानभावीपणाने) त्रिभाषा सूत्र मला समजावून देत होते! मी म्हटलं गेलं उडत तुमचं ते त्रिभाषा सूत्र! पहिलीच्या पोरांच्या दप्तरात हिंदीची पुस्तकं दिसली तर मी तुमच्या दप्तरात दगडं टाकीन!

दादू : (खुशीत येत) शाब्बास! आलाय मोठा शालेय शिक्षणमंत्री! हिंदीची सक्ती, महाराष्ट्रात कंबख्ती, हे अजून त्यांना कळलेलं नाही! एकदा ‘मातोश्री’वर येऊ दे, दाखवतो इंगा!

सदू : (थंडगार आवाजात) तू काय इंगा दाखवणार! माझ्याकडेच आले आणि तळहात बगलेत दाबून गेले!

दादू : (काहीही न कळून) का बुवा?

सदू : (शांत आवाजात) मी मोजून वीस छड्या मारल्या!

दादू : (खोट्या खोट्या सुरात) हिंदीसक्ती नही चलेगी, नही चलेगी! हिंदी हटाव, चिंधी हटाव! मराठी उद्गार बचाव, मराठी गद्दार हटाव!!

सदू : (खदखदत्या सुरात) कृपया मराठीत बोला!

दादू : (वैतागून) अरे हो रे बाबा! आलाय मोठा!! आम्ही मराठीचे मारक आणि तुम्ही एकटे तारक आहात काय? हिंदीसक्ती के खिलाफ हमनें भी आंदोलन छेडा है, समझे क्या?

सदू : (तावातावाने) हिंदी सक्ती नसतानाही खालीपिली हिंदी में कायकू बोलताय? तुमकू हिंदी पिक्चर बहोत अच्छे लगते है ना!!

दादू : (अभिमानाने) आख्खं बॉलिवुड आम्ही सांभाळलंय मिस्टर!!

सदू : (दुप्पट अभिमानानं) माझ्यामुळे मराठी सिनेमांना मल्टिप्लेक्सचे शो मिळायला लागले हे विसरु नकोस! मलाही सिनेमाचा शौक आहे, बट नॉट ॲट द कॉस्ट ऑफ मराठी भाषा!!

दादू : (स्वत:चं हिंदी प्रेम सांगत) ….वेळ मिळाला की मी हिंदी सिनेमा बघतोच! हल्ली तर दोन-दोन सिनेमे बघतो!! नाना पाटेकरांचा ‘प्रहार’ बघितलाय ना? त्यातला डायलॉग मी मध्यंतरी भाषणात मारला होता…

सदू : (हिणवत) हुं:! म्हणे कमॉन किल मी!! हिंदी सिनेमातला इंग्लिश डायलॉग!! मराठीचा पत्ता नाही!

दादू : (निर्धाराने) हिंदी सक्ती ही भाषिक आणीबाणी आहे, असं मी जाहीर केलंय! हिंदी सक्तीविरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत!

सदू : (हिरीरीनं) आंदोलन आम्ही करणार! सहा जुलैला गिरगावात मोर्चा काढणार!

दादू : (नेहले पे देहला) आम्हीसुद्धा मोर्चा काढू!! हिंदी सक्ती हा राजकारणाचा विषय नाही, उलट प्रत्येक पक्षानं या आंदोलनात सहभागी व्हायला हवं!

सदू : (करडेपणाने) आमचाही मोर्चा सर्वपक्षीयच आहे म्हटलं! तुम्ही येताय ना?

दादू : (पूर्वअट घालत) तू आमच्या मोर्चाला आलास तरच!!

सदू : (निषेधाच्या सुरात) मोर्चा मी आधी जाहीर केला!

दादू : (ठामपणाने) आंदोलन मी छेडलं!!

सदू : (छद्मीपणानं) मला वाटतं की हीच आपल्याला टाळीची संधी आहे!!

दादू : (टाळी वाजवत) ये हुई ना बात!! इस बात पे दे टाळी!!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.