Latest Maharashtra News Updates : पुण्याच्या भाजप शहराध्यक्षावर वीज चोरीचा आरोप
esakal June 30, 2025 10:45 AM
Pune : भाजप शहराध्यक्षावर वीज चोरीचा आरोप, काँग्रेसकडून जोरदार टीका

पुण्यात भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर स्वतःच्या कार्यालयासाठी वीज चोरी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आरोपांवरून काँग्रेसकडून जोरदार आक्रमक भूमिका घेतली जात असून, शहरात ठिकठिकाणी “बोला अण्णा, बोला ताई” अशा आशयाचे फ्लेक्स झळकले आहेत. धीरज घाटे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपानुसार, त्यांच्या कार्यालयात बिनबिलाची वीज वापरण्यात आली होती. या प्रकारामुळे काँग्रेसने महावितरण कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं होतं.

Mumbai : हिंदी सक्तीविरोधात मोर्चाची वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न : अजित पवार

हिंदी सक्ती विरोधात शिवसेना आणि मनसेने मुंबईत ५ तारखेला मोर्चाचे नियोजन केले आहे. मात्र मोर्चाची वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न असणार आहे. हिंदी सक्तीबाबत माझी भूमिका स्पष्ट असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय

Kedar Jadhav : भाजपमध्ये प्रवेश केलेल्या क्रिकेटरनं घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट

भारतीय क्रिकेटपटू आणि अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेले केदार जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीचे कारण केवळ औपचारिक नव्हते, तर बारामतीतील क्रिकेट ग्राउंडशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी ही भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. केदार जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "माळेगाव साखर कारखान्याच्या यशाबद्दल अजित पवार साहेबांचं अभिनंदन करण्यासाठी आलो होतो.

Mumbai : हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची विरोधी पक्ष आज होळी करणार

हिंदी सक्ती निर्णयाच्या विरोधात विरोधकांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलाय. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शासन निर्णयाची होळी करण्यात येणार आहे. शिवसेना ठाकरे गटासह इतर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यासाटी उपस्थित राहणार आहेत. हिंदी सक्तीविरोधात एकजुटीची हाक देण्यात आलीय.

Amalner : जळगावमधील माजी आमदाराच्या गाडीचा गुजरातमध्ये भीषण अपघात

जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. सुदैवाने अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही मात्र वाहनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. गुजरात येथील सारंगपूर देवस्थानाचे दर्शन घेऊन चौधरी कुटुंब नंदुरबारकडे येत असताना गुजरातमधील वटामन चौकडी येथे गाडीला अपघात झाला.

Rain Update : राज्यात सरासरीच्या 93% पावसाची नोंद, विदर्भ मात्र कोरडा

राज्यात यंदा जून महिन्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली असून, शनिवारपर्यंत सरासरीच्या 93 टक्के पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनने राज्यात दमदार एंट्री घेतली असली तरी विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये मात्र अपेक्षेपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात दरवर्षी जून महिन्यात सरासरी 208 मिमी पावसाची नोंद होते. यंदा मात्र, 29 जून (शनिवार) पर्यंत 194 मिमी पाऊस झाला आहे, जो सरासरीच्या सुमारे 93 टक्के इतका आहे.

MSRTC Bus : एसटी बस फक्त ३ नटबोल्टवर धावली, प्रवाशाच्या सतर्कतेमुळं अनर्थ टळला

श्रीवर्धन बस डेपो परिसरात एसटी महामंडळाच्या एक बसमधील धक्कादायक निष्काळजीपणा उघडकीस आला आहे. मुंबईहून आलेली ही बस पुढील प्रवासासाठी दिघीकडे रवाना होण्याच्या तयारीत असताना, नागरिकांच्या सतर्कतेमुळे एक मोठा अपघात टळला. या बसचे चाक केवळ तीन नट-बोल्टच्या आधारावर जोडलेले होते, ही बाब एका जागरूक नागरिकाच्या लक्षात येताच त्याने तात्काळ इतर प्रवाशांचे लक्ष वेधले.

Nashik News : नाशिकमध्ये ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार

ठाकरे सेनेचे माजी महानगर प्रमुख विलास शिंदे हे आज ठाण्यात शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत. या प्रवेश कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती राहणार असून, ठाण्यात मोठ्या राजकीय शक्तिप्रदर्शनाची तयारी झाली आहे. नाशिकमधून शेकडो वाहनांचा ताफा लवकरच ठाण्याकडे रवाना होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.