डॉ. वीरेंद्र ताटके - गुंतवणूक विषयाचे अभ्यासक
ट्रॅफिक जॅम ही समस्या आता एखाद्या शहरापुरती मर्यादित राहिलेली नाही. जगभरातील मोठमोठी शहरे या समस्येने ग्रासली आहेत. आपल्या देशात तर ही समस्या आता निमशहरी आणि ग्रामीण भागातसुद्धा भेडसावू लागली आहे. घरातून निघताना रस्त्यात किती ट्रॅफिक लागेल? आपण निवडलेला रस्ता योग्य असेल का? आज चारचाकी गाडीने जावे की दुचाकीने जावे? योग्य वेळेत आपण इच्छित स्थळी पोहोचू का? यांसारखे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात दररोज येत असतात.
माझ्या एका मित्राने या ट्रॅफिक जॅमचा अभ्यास करून स्वतःसाठी मार्ग शोधून काढला आहे. ट्रॅफिक जॅमच्या या सर्व समस्यांचा शांतपणे सामना करत तो त्याच्या दिवभराच्या कामांचे नियोजन करतो. ट्रॅफिक जॅममधील लोकांची स्थिती आणि शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची स्थिती एकसारखीच असते, असे तो म्हणतो आणि म्हणूनच हा मित्र शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’ची निवड करतो. या दोन्ही ठिकाणच्या जॅममधून सुटका करून घेण्यासाठी तो एकसारखेच नियम वापरतो.
अंदाजासाठी वेळ घालवू नका
माझा हा मित्र ट्रॅफिकविषयी आणि शेअर बाजाराविषयी अंदाज वर्तविण्यात वेळ घालवत नाही. कोणत्या रस्त्यावर जास्त ट्रॅफिक आहे हे मोबाईलवर बघण्यात तो सकाळी सकाळी वेळ घालवत नाही. त्याचप्रमाणे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी जगभरात घडत असलेल्या घडामोडींचा आढावा घेऊन रोज अंदाज बांधण्याएवढासुद्धा वेळ त्याच्याकडे नसतो. शिवाय प्रत्येकवेळी आपला अंदाज बरोबरच येईल, याची त्याला खात्री नसते. त्यामुळे अंदाजांच्या ट्रॅफिक जॅममध्ये न अडकता तो शांतपणे आपली म्युच्युअल फंड ‘एसआयपी’ गुंतवणुकीची गाडी हळूहळू पुढे नेत राहतो.
चिडचिड टाळा
गाडी चालवताना एखादा हिरवा सिग्नल काही कारणाने चुकला, तर आपली चिडचिड होते. अगदी तशीच चिडचिड गुंतवणुकीची एखादी संधी चुकली की होते. मात्र, दीर्घकाळासाठी ‘एसआयपी’द्वारे नियमित गुंतवणूक करणाऱ्या या मित्राची गुंतवणुकीची संधी कधीच चुकत नाही, त्यामुळे त्याची चिडचिड होत नाही.
वेळेत निघा; वेग मर्यादित ठेवा
ट्रॅफिक जॅममुळे प्रवासाचा वेळ वाढतो आणि इच्छित स्थळी पोहोचायला उशीर होतो. याचा परिणाम म्हणजे प्रत्येकजण गाडीचा वेग वाढवायचा प्रयत्न करतो आणि अपघाताला आमंत्रण देतो, याचा अनुभव या मित्राने पूर्वी खूप वेळा घेतला होता. तेव्हापासून त्याने घरातून थोड लवकर निघायला सुरुवात केली आणि आता तो त्याच्या गाडीचा वेग मर्यादित ठेवूनदेखील ऑफिसला वेळेत पोहोचतो. गुंतवणूक करतानासुद्धा तो ‘एसआयपी’सारख्या नियमित आणि मर्यादित वेगाने जाणाऱ्या गाडीचा उपयोग करतो. त्याच्या गुंतवणुकीचे उिद्दष्टसुद्धा ठरलेले आहे, त्यामुळे वेळेत न पोहोचण्याचे दडपण त्याला येत नाही आणि अपघातसुद्धा घडत नाही.
माझ्या या मित्राप्रमाणेच देशातील अनेक गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी ‘एसआयपी’चा मार्ग निवडत आहेत. मे २०२५ या महिन्यात देशातील ‘एसआयपी’ योगदानाने २६,६८८ कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला आणि ‘एसआयपी’ खात्यांची संख्या ८.५६ कोटींवर पोहोचली. माझ्या मित्राच्या शब्दांत सांगायचे, तर शेअर बाजारातील धोके आपण टाळू शकत नाही; पण ‘एसआयपी’च्या मदतीने त्यातून आपण आपल्यापुरता मार्ग नक्कीच काढू शकतो.