भोसे, ता. २९ : रांजणी (ता. जावळी) येथील पवारवस्तीत काल रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात कुत्रा ठार झाला. यामुळे रांजणी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची माहिती अशी, रांजणी परिसरात गेल्या महिनाभरापासून बिबट्याचा वावर वाढला होता. गावातील महिला, शेतात काम करणारे मजूर व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण होते.
काल रात्री पवारवस्तीतील शरद पवार यांनी आपल्या दारात बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला चढवला. त्यात कुत्रा मृत्युमुखी पडला. याबाबत पवार यांनी वन विभागाशी संपर्क साधला. त्यामुळे आज वन अधिकारी नेताजी वासुदेव आणि श्री. लांगे यांनी घटनास्थळी भेट दिली. पाहणी केली असता हल्ला करणारा बिबट्याच असल्याचे सांगितले.
यावेळी वन अधिकारी नेताजी वासुदेव यांनी गावातील महिला, लहान मुले व नागरिकांनी काळजी घ्यावी. रात्रीच्या वेळी कुणीही घराबाहेर पडू नये, तसेच पाळीव प्राण्यांना घराच्या बाहेर बांधू नये. शेतकऱ्यांनी शेतात जाताना आपली काळजी घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी पोलिस पाटील किरण जंगम, शरद पवार तसेच नागरिक उपस्थित होते. दरम्यान, दोन दिवसांपासून राघववाडी व पवार आळीतील रवी रांजणे, शैलेश रांजणे, प्रकाश रांजणे यांचीही कुत्री बिबट्याने फस्त केली आहेत. या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.