रोहा, ता. ३ (बातमीदार) ः रोहा शहरासह जिल्ह्याला आठवडाभरापासून पावसाने चांगलेच झोडपले. बुधवारी पावसाने विश्रांती घेताच नगर परिषदेकडून साफसफाईची कामे सुरू करण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यावरील कचरा उचलणे, नाल्यांची सफाई आणि धूरफवारणी आदी कामे हाती घेण्यात आली होती.
नगरपालिका प्रशासनाने या कामासाठी मनुष्यबळ आणि संसाधने उपलब्ध करून दिली आहेत. अतिवृष्टीमुळे कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. पुराचे पाणी अष्टमी येथील कोळीवाड्यात शिरले होते. लाकडी ओडके, प्लॅस्टिक, कपडे अडकल्याने नाले तुंबले होते. त्यामुळे तुंबलेला पाणी लोकवस्तीत शिरल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली. नगरपालिका कर्मचाऱ्यांनी नाल्यांची सफाई करून प्रवाह सुस्थितीत केला. वैकुंठभूमी, बाजारपेठ, विठ्ठल मंदिर परिसर, शाळा, छत्रपती शिवाजी नगर तसेच शहरातील सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर टीसीएल पावडर फवारणी करण्यात आली. डास आणि रोगराई प्रतिबंधात्मक औषध व धूर फवारणी करण्यात आली.
माजी उपनगराध्यक्ष समीर सकपाळ यांनी स्वखर्चाने आपल्या प्रभागात टीसीएल पावडर मारून परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला.
रोहा शहरात साफसफाई, धुरीकरण जोरात असून, स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवण्यासाठी नागरिकांनीदेखील सहकार्य करावे. घरातून निघणारा कचरा अयोग्य ठिकाणी टाकू नये, परिसरात स्वच्छता राखावी. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे.
- अजयकुमार एडके, मुख्याधिकारी, रोहा
रोहे ः शहरात टीएलसी पावडर फवारणी करण्यात येत आहे.