पुण्यात कुरियर आणल्याचं सांगून तरुणीवर बलात्कार, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
BBC Marathi July 04, 2025 03:45 AM
Getty Images प्रातिनिधिक छायाचित्र

पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये डिलिव्हरी बॉय असल्याचं सांगून एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपीनं पीडित तरुणीवर अत्याचार केल्यानंतर तिच्यासोबत सेल्फी काढून तो पसरवण्याची धमकीही दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (2 जुलै) संध्याकाळी ही घटना घडली. 22 वर्षांची ही तरुणी आयटी कंपनीमध्ये नोकरी करते. ही तरुणी कोंढवा परिसरात भावासोबत राहते.

घटना घडली त्यावेळी तिचा भाऊ काही कामानिमित्ताने बाहेर गेल्याने ती घरी एकटीच होती. याच वेळी कुरियरची डिलिव्हरी करायची असल्याचं सांगून हा आरोपी तिच्या घरी पोहोचला.

असे काही कुरियर येणार नसल्याचे तरुणीने सांगितल्यानंतरही त्याने कागदपत्रांवर तशी सही करण्यास सांगितले. सही करण्यासाठी तिने सिक्युरिटी गेट उघडल्यावर तो आत शिरला आणि तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून तिच्यावर अत्याचार केला.

यानंतर साधारण रात्री साडेआठच्या सुमारास या तरुणीला शुद्ध आल्यानंतर हा प्रकार तिच्या लक्षात आला. तिने आपल्या परिचयाच्या व्यक्तींना संपर्क साधून त्यांना घडलेल्या प्रकाराची कल्पना दिली. त्यानंतर रात्री उशीरा कोंढवा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 63, 77 आणि 351 (2) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

Getty Images प्रातिनिधिक छायाचित्र

झोन 5 चे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार," डिलिव्हरी बॉयने पीडित तरुणीला पेन नसल्याचे सांगितले. ती पेन आणायला गेल्यावर त्याने आत येऊन घराचा दरवाजा बंद केला आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला."

"तिच्या फोनमध्ये एक सेल्फी आढळला. त्याबाबत आम्ही तपास करत आहोत. तसेच तिला बेशुद्ध करण्यासाठी काय करण्यात आले? याबाबत तपास करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांना घटनास्थळी बोलावले आहे. त्यांच्या तपासानंतर याबाबत अधिक स्पष्टता येईल."

पोलिसांच्या माहितीनुसार कात्रज-कोंढवा रस्त्यावरील परिसरातील ही सोसायटी उच्चभ्रू वस्तीत आहे. या इमारतीच्या बाहेर सुरक्षारक्षक देखील तैनात होते. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती घेऊनच त्यांना आत सोडलं जात होतं.

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सोसायटीमध्ये प्रवेश देण्यासाठी मान्यता देण्यासाठी कोणतंही ॲप वापरलं जात नव्हतं. त्यामुळे सुरक्षा रक्षकांकडे नोंदणी केल्यानंतर सोसायटीत प्रवेश मिळत होता. त्यामुळे या तरुणीच्या 11व्या मजल्या वरील घरापर्यंत हा आरोपी पोहोचू शकला.

पोलिसांच्या इतर टीम वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या आधारे देखील पुढचा तपास केला जात आहे.

आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी एकूण 10 टिमची स्थापना केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिंदे यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात क्राइम डिपार्टमेंटच्या 5 टिम आणि इतर 5 टिमचा समावेश आहे. याबरोबरच श्वान पथकाच्या मदतीने देखील तपास केला जात आहे.

आरोपीने काढलेल्या फोटोमध्ये त्याच्या चेहर्याचा काही भाग दिसत असून त्याच्या आधारे देखील आरोपीचे स्केच तयार केले जात आहे. मात्र सीसीटीव्हीमध्ये अनेक चेहरे दिसत असल्याने आरोपीला ओळखण्यात पोलिसांना अडचण देखील येत आहे.

सोसायटी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत- नीलम गोऱ्हे

बलात्काराच्या या घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांकडे तत्काळ आणि प्रभावी कारवाईची मागणी केली आहे.

  • गोऱ्हे यांनी याप्रकरणी विशेष तपास पथकाची तत्काळ स्थापना करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे पथक कार्यरत करून घटनेचा सखोल तपास केला जावा, असे त्यांनी सुचवले आहे.
  • तसेच, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला तत्काळ अटक करण्यात यावी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत तसेच भारतीय न्याय संहितेतील इतर तरतुदी अंतर्गत गुन्हा दाखल करून अनुभवी विधी अधिकाऱ्यांच्या मदतीने लवकरात लवकर चार्जशीट दाखल करावी, अशी त्यांनी सूचना केली आहे.
  • या घटनेनंतर सोसायटीमधील सुरक्षाव्यवस्थेची त्रुटी स्पष्टपणे समोर आली असल्याने गोऱ्हे यांनी सुरक्षारक्षक, रजिस्टर नोंदी व प्रवेश नियंत्रण यंत्रणेची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
  • पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांनी सर्व गेटेड सोसायट्यांमध्ये प्रवेश नोंदणी सक्तीची करणे, बायोमेट्रिक किंवा डिजिटल लॉग प्रणाली अनिवार्य करणे आणि महिला सुरक्षेसाठी हेल्पलाइन क्रमांक सोसायटीमध्ये दिसेल अशा पद्धतीने लावणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
  • तसेच, पोलीस प्रशासनाने "सोसायटी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे" तयार करून सर्व सोसायट्यांमध्ये त्याची अंमलबजावणी करावी, अशीही त्यांनी सूचना केली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

  • स्वारगेट प्रकरणातील आरोपीला 12 दिवसांची पोलीस कोठडी, कंडक्टर असल्याचं भासवून ओढलं होतं जाळ्यात
  • भारतातल्या वाढत्या बलात्कारांची संख्या समजून घ्या या 5 तक्त्यांमधून...
  • 'पतीच्या मारेकऱ्याशी लग्न केलं आणि त्याची हत्या करून बदला घेतला'
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.