आषाढी वारीसाठी एसटी आगार सज्ज
esakal July 04, 2025 03:45 AM

आषाढी वारीसाठी एसटी आगार सज्ज
कल्याण, ता. ३ (बातमीदार) : शहरी व ग्रामीण भागातील भाविकांसाठी एसटी महामंडळाच्या विभागीय सूचनेनुसार प्रत्येक आगारात विशेष नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार यंदा कल्याण व विठ्ठलवाडी एसटी आगारातून शुक्रवारी (ता. ४) जवळपास १६ एसटी बस मार्गस्थ होणार आहेत. याचा लाभ कल्याण, डोंबिवली, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, मुरबाड येथील भाविकांना घेता येणार आहे.

आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून हरी नामाचा जप करीत हजारो वारकरी, भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होतात. रविवारी (ता. ६) पंढरपुरात होणाऱ्या सोहळ्यासाठी भक्तगण रेल्वे, एसटी, खासगी अशा मिळेल त्या वाहनाने दाखल होतात. या भक्तांची विशेष सोय म्हणून एसटी महामंडळ दरवर्षी राज्यातील कानाकोपऱ्यातून एसटी बसचे नियोजन करीत असते. यानुसार कल्याण व विठ्ठलवाडी एसटी आगारात चार दिवसांचे नियोजन ठरलेले आहे.

ठाणे विभागातून मिळालेल्या सूचनांनुसार त्याचे पालन केले जाणार आहे. कल्याण आगारातून ११, तर विठ्ठलवाडी एसटी आगारातून एकूण पाच गाड्या मार्गस्थ होणार आहेत. मार्गस्थ होत असलेल्या या बसमध्ये नियमित, जादा व ग्रुप बुकिंग अशा प्रकारच्या गाड्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त विठ्ठलवाडी एसटी आगाराच्या आणखीन चार बस भिवंडी येथून, तर कल्याण आगाराच्या सहा बस शहापूर येथून पंढरपूर वारी करणार आहेत. ठरलेल्या निर्धारित वेळेनुसार सर्व गाड्या मार्गस्थ होणार असून, ग्रुप बुकिंग असलेल्या बस मात्र प्रवाशांनी मागणी केलेल्या वेळेत सोडण्यात येतील. कल्याण आगाराच्या एसटी बस तारकपूरमार्गे जाणार आहेत. विठ्ठलवाडी एसटी आगाराच्या बस चांदणी चौक मार्गे जाणार आहेत.

परतीचा प्रवास
भाविकांना पंढरपुरात घेऊन गेलेल्या सर्व एसटी बस आषाढी सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता.७) पुन्हा कल्याणला परतणार आहेत. पंढरपूरच्या चंद्रभागा स्थानकातून या सर्व बस तेथील ठरलेल्या वेळेनुसार सुटतील. यासाठी कल्याण एसटी आगाराच्या सहा बस आरक्षित झाल्या आहेत. आणखी सात बस प्रवाशांच्या गर्दीनुसार म्हणजेच प्रवासी घेऊन शक्य तशा वेळेत परततील, अशी माहिती कल्याण आगार व्यवस्थापक महेश भोये यांनी दिली आहे, तर विठ्ठलवाडी एसटी आगाराच्या पाच बसच्या परतीचे आरक्षण झाल्याची माहिती विठ्ठलवाडी आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांनी दिली आहे.

बारमाही पंढरपूर वारी :
आषाढी एकादशीनिमित्त जादा गाड्या सोडण्यात येत असल्या तरी विठ्ठलवाडी एसटी आगारातून दररोज पंढरपूरसाठी एक एसटी नियमित रवाना होते. सकाळी ७ वाजता ही एसटी विठ्ठलवाडी येथून मार्गस्थ होते. पुढे कल्याण, डोंबिवली स्थानकातून प्रवासी घेत चांदणी चौक मार्गे पुढे जात दुपारी ४ ते ५ दरम्यान पंढरपूर गाठते, तर हीच गाडी पुन्हा विठ्ठलवाडीसाठी पहाटे ५ वाजता परतीचा प्रवास सुरू करते. दुपारी २ ते ३ पर्यंत परत येते. विठ्ठलवाडी येथून सकाळी ८ वाजता सुटणाऱ्या कलेढोण एसटीनेही फलटणपर्यंत प्रवास करीत पुढे वाहन बदलून पंढरपूरला पोहोचता येते.

कल्याण एसटी आगाराचे नियोजन :
स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुरू असल्याने कल्याण एसटी आगार तात्पुरत्या स्वरूपात विठ्ठलवाडी एसटी आगारात स्थलांतरित केला असला तरी कल्याणच्या जुन्या आगारामागील बास्केटबॉल कोर्ट परिसरात तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे.

शुक्रवार
एकूण बस - २
नियमित - १
निर्धारित वेळ - सकाळी ७ वा.

शनिवार
एकूण बस - ७
नियमित - २
निर्धारित वेळ - सकाळी ६ व ७ वाजता व इतर ठरावीक वेळेत

रविवार
एकूण बस - २
नियमित - १
निर्धारित वेळ - सकाळी ७ वाजता


विठ्ठलवाडी एसटी आगाराचे नियोजन :
शुक्रवार
एकूण बस - २
नियमित- १
निर्धारित वेळ - सकाळी ७ वाजता.

शनिवार
एकूण बस - २
नियमित- १
निर्धारित वेळ - सकाळी ७ वाजता.

रविवार
एकूण बस - १
नियमित- १
निर्धारित वेळ - सकाळी ७ वाजता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.