शुभमन गिलचं द्विशतक, जडेजाचं अर्धशतक अन् आकाशदीप, सिराजची कमाल, इंग्लंडला तीन धक्के
Marathi July 04, 2025 04:24 AM

बर्मिंघम :  भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला आहे. दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी भारताच्या संघानं 587 धावांपर्यंत मजल मारली. यामध्ये शुभमन गिलनं 269 धावा केल्या तर रवींद्र जडेजानं 89 धावा केल्या. भारताचा डाव संपल्यानंतर वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडला तीन धक्के दिले. शुभमन गिलचं द्विशतक, रवींद्र जडेजाचं अर्धशतक आणि भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला दिलेले तीन धक्के महत्त्वाचे ठरले आहेत. 

शुभमन गिलचं द्विशतक 

भारताचा कॅप्टन शुभमन गिल यानं 269  धावांची खेळी केली. भारतानं शुभमन गिलनं रवींद्र जडेजाच्या साथीनं 203 धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजानं 89 धावा करत शुभमन गिलला साथ दिली. शुभमन गिलनं रवींद्र जडेजा बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर यांच्या सोबत भागीदारी केली.  वॉशिंग्टन सुंदर यानं 42 धावा केल्या. शुभमन गिलनं दमदार खेळी करत 269 धावा केल्या.

शुभमन गिलनं अनेक विक्रम मोडले

शुभमन गिलनं इंग्लंडमध्ये इंग्लंड विरुद्ध भारताचा कॅप्टन म्हणून सर्वाधिक धावा केल्या आहेत. शुभमन गिलनं इंग्लंड विरुद्ध 269 धावा केल्या आहेत.  यापूर्वी भारताचा कॅप्टन मोहम्मद अजहरुद्दीन यानं 1990 मध्ये 179 धावा केल्या होत्या. हा विक्रम शुभमन गिलनं मोडला. यानंतर इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुनील गावसकर आणि राहुल द्रविड यांच्या नावावर होता. सुनील गावसकर यांनी 1979 मध्ये 221 धावा केल्या होत्या तर राहुल द्रविडच्या नावावर 217 धावांची नोंद होती. शुभमन गिलनं हा रेकॉर्ड देखील मोडला. यानंतर शुभमन गिलनं विराट कोहलीचा कॅप्टन म्हणून 254 धावांचा विक्रम मोडला. 

भारताकडून इंग्लंडला तीन धक्के 

भारताचा डाव 587 धावांवर आटोपल्यानंतर इंग्लंडचा संघ फलंदाजीला मैदानात आला. जसप्रीत बुमराहला विश्रांती दिल्यानं आकाशदीपला संधी देण्यात आली होती. आकाशदीपनं इंग्लंडला तिसऱ्या ओव्हरमध्येच दोन धक्के दिले. बेन डकेट आणि ओली पोपची विकेट  आकाशदीपनं काढली. यानंतर क्रॉलीची विकेट मोहम्मद सिराजनं काढली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं 20 ओव्हरमध्ये 3 बाद 77 धावा केल्या होत्या. जो रुट 18 आणि हॅरी ब्रुक 30 धावांवर फलंदाजी करत होते. 

भारताला दुसऱ्या कसोटीत विजय आवश्यक

भारतानं पहिल्या कसोटीत पराभव स्वीकारला होता. अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफीमधील हेडिंग्ले येथील लीडस वरील कसोटी भारतानं गमावली होती. त्यामुळं इंग्लंडनं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. आता भारतानं इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटीत  पहिल्या डावात 587 धावांचा डोंगर उभा केल्यानं संघ मजबूत स्थितीत आहे.   

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.