जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगावातील पक्षाच्या आढावा बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर मंत्रिपदाबाबतची इच्छा जाहीरपणे बोलून दाखविली असल्याचं पाहायला मिळाले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वात एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर अनिल पाटील यांना मंत्रिपद मिळालं होतं. अनिल पाटील हे जळगावातील अमळनेरचे आमदार आहेत.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि पहिल्यांदा मंत्रिपद मिळाले याबाबतचा किस्सा सांगताना आमदार अनिल पाटील पुन्हा मंत्री पदाबाबतची जाहीरपणे इच्छा बोलून दाखविली आहे. त्यादिवशी 2 जुलै 2023 होती, त्यामुळे काल सुद्धा 2 जुलै ही तारीख होती, मी तटकरे साहेबांसोबत होतो. त्यामुळे तटकरे साहेब आता बोलतील, तेंव्हा बोलतील अशी मी वाट पाहत होतो.
माझ्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, पण जाहीर करा असे म्हणणार नाही, या शब्दात आमदार अनिल पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या समोर बैठकीत मंत्रिपदाबाबतची इच्छा बोलून दाखविली आहे. त्यादिवशी रात्री 12 वाजता दादांच्या बंगल्यावर पोहोचलो.. नाश्ता केला …तटकरे साहेब…समोरुन आले..आपल्याला मंत्रिमंडळात शपथविधीसाठी जायचे आहे,असे त्यांनी सांगितले. सर्वात आधी मला मंत्री पदाबद्दल सांगणारे सुनील तटकरे साहेब होते, त्यांनीच मला मंत्री पदाबद्दल कानात सांगितले, त्यानंतर आम्ही शपथविधीसाठी गाड्यांमध्ये गेलो होतो, अशी आठवण अनिल पाटील यांनी सांगितली.
काल पुन्हा 2 जुलै ही तारीख होती…मी कोट घालून गेलो, 12 वाजले, तटकरे साहेब आता बोलतील, केंव्हा बोलतील….अशी मी वाट पाहत होतो.. आमच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, पण जाहीर करा,असे मी बोलणार नाही असे यावेळी भाषणात आमदार अनिल पाटील म्हणाले.
कोण आहेत अनिल पाटील?
आमदार अनिल पाटील हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनिल पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणं पसंत केलं होतं. अनिल पाटील हे जळगावातील अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आहेत. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवारांच्यासोबत ज्या नेत्यांनी शपथ घेतली होती त्यामध्ये अनिल पाटील यांचा समावेश होता. आता, अनिल पाटील यांना पुन्हा मंत्रिमंडळात कधी स्थान मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. विशेष बाब म्हणजे सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात केवळ एक जागा शिल्लक आहे. एखाद्या नेत्याला मंत्री व्हायचं असेल तर सध्या चे मंत्री आहेत त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो.
आणखी वाचा