डॉ. वळसंगकर आत्महत्येची गुंतागुंत वाढली! शेवटच्या 3 दिवसांत डॉक्टर तब्बल 11 वेळा फोनवरून बोलले एकाच व्यक्तीला, 'सीडीआर'मधून समोर आली माहिती, वाचा सविस्तर...
esakal July 04, 2025 01:45 PM

तात्या लांडगे

सोलापूर : पोलिसांनी न्यायालयाला दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर डॉ. शिरीष वळसंगकर यांचे सीडीआर दिले. यातून शेवटच्या तीन दिवसांत ते एकाच व्यक्तीशी तब्बल ११ वेळा बोलल्याचे दिसते. हे एकाच व्यक्तीचे कॉल आणि ‘मनीषाचे घाणेरडे आणि खोटारडे आरोप’ यातील तथ्य शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

पोलिसांनी डॉ. वळसंगकर आत्महत्येचा तपास करून ९४० पानांचे दोषारोपपत्र सादर केले. त्यानंतर मनीषाच्या जामिनावर निकाल देताना न्यायालयाने दोषारोपपत्रातील त्रुटींवर टिप्पणी केली. आरोपी मनीषाचे कृत्य आणि डॉक्टरांची आत्महत्या याचा थेट संबंध दिसत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. या पार्श्वभूमीवर सीडीआरमधील माहितीमुळे डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येमागे नेमके कारण काय या प्रश्नाचे उत्तर पोलिसांना शोधावेच लागणार आहेत. डिसेंबर २०२४ मध्ये डॉक्टरांनी चार वर्षांनी स्वत: रुग्णालयात लक्ष द्यायला सुरवात केली आणि प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे यांचे अधिकार कमी केले. मग, मनीषाने मुलांसह स्वत: रूग्णालयासमोर आत्महत्या करेन, असा ई-मेल डॉक्टरांसह चौघांना केला.

पण, मनीषाने केलेल्या खोटारड्या आणि घाणेरड्या आरोपांमुळे आपण व्यतीत झालो असून तिच्या त्रासामुळे जीवन संपविण्याचा निर्णय घेतल्याचे डॉक्टरांनी फोन करून व भेटून आपल्याला सांगितल्याचे डॉ. अश्विन यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. परंतु, डॉक्टरांच्या ‘सीडीआर’मधून समोर आलेल्या माहितीवरून तीन दिवसांत ११ वेळा डॉक्टर एकाच व्यक्तीला एक सेकंद ते १४२६ सेंकद नेमके कोणत्या मुद्द्यांवर बोलले आणि ती व्यक्ती कोण आहे?, ही बाब दोषारोपपत्रात स्पष्टपणे नमूद केलेली दिसत नाही. त्यामुळे अजूनही डॉक्टरांनी नेमकी आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली?, या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर जनतेला मिळालेले नाही.

मनीषाचे वकील दोषमुक्तीसाठी करणार अर्ज

डॉ. अश्विन वळसंगकर यांच्या फिर्यादीनंतर डॉ. शिरीष यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात मनीषा मुसळे माने यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला. २६ सप्टेंबर रोजी दोषनिश्चितीची तारीख असून त्या दिवशी संशयित आरोपीस गुन्हा कबूल किंवा कबूल नाही, हे न्यायालयासमोर सांगावे लागणार आहे. त्यानंतर खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ होईल. तत्पूर्वी, मनीषा यांचे वकील प्रशांत नवगिरे हे मनीषावरील आरोप खोटे असून त्यांना या गुन्ह्यातून दोषमुक्त करावे, असा अर्ज दाखल करण्याची दाट शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.