तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात २८ डी.एड. महाविद्यालये असून, त्यांची प्रवेश क्षमता १५०० इतकी आहे. डी.एड. प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत संपली असून, सोलापूर जिल्ह्यातील बारावी उत्तीर्ण ५० हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ एक हजार ३८ विद्यार्थ्यांनीच शिक्षक होण्यास पसंती दर्शविली आहे. पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली असून ५५ ते ६५ टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांना डी.एड.साठी प्रवेश मिळाला आहे.
राज्य सरकारने २००५-०६ च्या काळात सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर डी.एड. महाविद्यालयांना मान्यता दिली. पण, डी.एड.चे शिक्षण पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षक भरती झाली नाही. सद्य:स्थितीत राज्यात १० लाखांहून अधिक विद्यार्थी (वयोमानानुसार नोकरीस पात्र) डी.एड. झालेले आहेत. सध्या ते शेतीसह अन्य व्यवसाय करीत आहेत. इंग्रजी माध्यमाच्या वाढणाऱ्या खासगी स्वयंअर्थसहाय्यित शाळा आणि पालकांचा वाढलेला इंग्रजी माध्यमाकडील कल, यामुळे मराठी विशेषत: जिल्हा परिषदांसह खासगी अनुदानित शाळांमधील पटसंख्या कमी होत आहे. त्यामुळे दरवर्षी सुमारे १० हजार शिक्षक अतिरिक्त होत असल्याने आगामी काळात शिक्षक भरती होईल की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील एक-दोन वर्षात आणखी डी.एड. महाविद्यालयांना कुलूप लावावे लागेल, असा अंदाज अधिकारी व्यक्त करीत आहेत.
१८ वर्षांत ५८ महाविद्यालयांना टाळे
सोलापूर जिल्ह्यात २००७-०८ या सालात डी.एड.ची तब्बल ८६ महाविद्यालये होती. त्या ठिकाणी ४५ हजार प्रवेश क्षमता होती आणि दरवर्षी डी.एड.साठी त्यावेळी दोन लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करीत होते. त्यावेळी विज्ञान शाखेचे मेरिट ७५ टक्क्यांवर आणि कला, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचे मेरिट ८० टक्क्यांवर होते. आता विद्यार्थ्यांनी डी.एड.कडे पाठ फिरविल्याने ४५ ते ५० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळत असल्याची स्थिती आहे. पटसंख्येअभावी १८ वर्षांत सोलापूर जिल्ह्यातील ५८ डी.एड. महाविद्यालयांना कुलूप लावावे लागले आहे.
गुणवत्ता यादीनुसार सर्वांना मिळतील प्रवेश
सोलापूर जिल्ह्यातील २८ डी.एड. महाविद्यालयांनी यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत सहभाग नोंदविला असून, त्यांची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्या ठिकाणी दीड हजार प्रवेश क्षमता असून यंदा १४३८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, पण त्यातील १०३८ विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत. क्षमतेपेक्षा कमी अर्ज आल्याने अर्जदार सर्व विद्यार्थ्यांना डी.एड.साठी प्रवेश मिळेल.
- जितेंद्र साळुंखे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सोलापूर
डी.एड.ची जिल्ह्यातील स्थिती
एकूण महाविद्यालये
२८
एकूण प्रवेश क्षमता
१,५३०
विद्यार्थ्यांचे अर्ज
१,४३८
छाननीत पात्र ठरलेले अर्ज
१,०३८