सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळीत १६० चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांचे म्हाडाकडून पुनर्वसन सदनिका बांधण्याचे काम वेगात सुरू आहे. डिसेंबरअखेर चार हजार रहिवाशांना हक्काचे घर देण्याचे म्हाडाचे नियोजन असून, पहिल्या टप्प्यात सुमारे ५५६ रहिवाशांना घराचा ताबा दिला जाणार आहे. त्यामुळे बीडीडीवासीयांच्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती होणार आहे.
वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथे ९२ एकर जागेवर १९५ बीडीडी चाळी आहेत. त्यामध्ये १५ हजार ५९३ सदनिका, गाळे आणि स्टॉल आहेत. बीडीडी चाळींचा टप्प्या टप्प्याने पुनर्विकास केला जाणार असून, येथील रहिवाशांना ५०० चौरस फुटांची सदनिका दिली जाणार आहे. त्यासाठी ४०-४२ मजली इमारती येथे उभारल्या जात आहेत. त्यापैकी अनेक इमारतींचे अंतर्गत कामे सुरू आहेत. त्यामुळे डिसेंबर अखेर २०२५ पर्यंत वरळी येथील १६९०, नायगाव येथील १४०० तर ना. म. जोशी मार्ग येथील ३५० रहिवाशांना घराचा ताबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
---------
आठवडाभरात इमारतींना ओसी
वरळी बीडीडीमधील इमारत क्रमांक १ मधील डी आणि ई विंगचे ४० मजल्यांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच इमारतींना अग्निशमन दलाकडून एनओसी मिळाली असून, पाण्याची जोडणीही झाली आहे. त्यामुळे पुढील आठवडाभरात भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळणार असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यानंतर संबंधित ५५६ रहिवाशांना घराचा ताबा दिला जाणार आहे.
-----------------
प्रकल्पांची सद्यःस्थिती
वरळी बीडीडी
- वरळी बीडीडी येथे १२१ चाळी आहेत. त्यामध्ये ९६८९ भाडेकरू रहिवासी आहेत.
- ४२ मजली ३४ इमारती उभ्या राहणार (बेसमेंट, पोडीयमसह)
- इमारत क्रमांक १ मधील आठ विंगचे काम प्रगतिपथावर आहे. यापैकी डी आणि ई विंगचे ४० मजले पूर्ण झाले आहेत.
- सहा विंगचे संरचनात्मक काम विविध मजल्यांपर्यंत पोहोचले आहे.
---------
ना. म. जोशी मार्ग परेल
- ना. म. जोशी मार्ग येथे ३२ बीडीडी चाळ असून, त्यामध्ये २५६० भाडेकरू रहिवासी आहेत.
- २६ मजली १४ इमारती उभारल्या जाणार आहेत.
- पहिल्या टप्प्यांतर्गत सात विंगपैकी दोन विंगचे सिव्हिल वर्क वेगात सुरू आहे.
- एका विंगचा पाया, तर एका विंगचे तळघर प्रगतिपथावर आहे.
---------
नायगाव
- नायगाव बीडीडी येथे ४२ चाळी असून, त्यामध्ये ३३४४ भाडेकरू रहिवासी आहेत.
- सुमारे २६ मजली २० इमारती बांधल्या जाणार आहेत.
- काम दोन टप्प्यात होणार असून, इमारत क्रमांक १ मधील आठ टॉवरचे काम २० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे.