पावसाळा सुरू झाला आहे, पावसामुळे केवळ सर्वत्र निसर्ग हिरवागारच होत नाही,तर पावसाळा सोबत सापांचं देखील संकट घेऊन येतो. पावसाळ्यामध्ये सापांच्या बिळांमध्ये पाणी घुसतं, त्यामुळे ते वर येतात. लपण्यासाठी उबदार जागा शोधतात, घरात असलेल्या एखाद्या अडगळीच्या जागेचा आसारा घेतात. त्यामुळे पावसाळ्यात सर्प दंश होण्याच्या घटना देखील वाढतात. सरकारी आकडेवारीनुसार भारतामध्ये दरवर्षी तीस ते चाळीस लाख सर्पदंशाची प्रकरणं समोर येतात. त्यातील 5O हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू होतो. मात्र अनेकांना असा प्रश्न पडतो की आपल्याला जो साप चावला आहे, तो विषारी आहे की बिनविषारी हे कसं ओळखायचं? त्याबाबतच आज आपण जाणून घेणार आहोत.
विषारी आणि बिनविषारी सापांमधील फरक
जेव्हा तुम्हाला सर्पदंश होतो, तेव्हा घाबरून जाऊ नका, सर्व प्रथम हे लक्षात घ्या तुम्हाला चावलेला साप हा विषारी आहे की बिनविषारी? आता ते कसं ओळखायचं? तर सोपं आहे, त्यासाठी एक खास ट्रिक आहे. जे त्याच्या दातावरून तुम्ही ओळखू शकता, म्हणजे तुम्हाला चावलेला साप हा जर विषारी असेल तर केवळ त्याचे दोनच दात तुम्हाला दंश झालेल्या ठिकाणी दिसतील. मात्र तो जर बिनविषारी असेल तर तुम्हाला दंश झालेल्या ठिकाणी अनेक दातांचे करवतीसारखे निशाण दिसेल उदाहरण द्यायचं झालं तर धामण,धामण जातीचा साप भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो, हा एक बिनविषारी साप आहे. हा जेव्हा चावतो, तेव्हा त्या जागी तुम्हाला अनेक दातांचे ओळखण दिसते. मात्र नाग हा विषारी असतो, जर तुम्हाला नागाने दंश केला तर तुम्हाला त्या ठिकाणी फक्त दोनच दात दिसतील, यावरून तुम्ही सहज विषारी आणि बिनविषारी साप ओळखू शकता.
लक्षणं ओळखा – जर तुम्हाला विषारी साप चावला असेल तर त्याची लक्षणं लगेचच दिसायला सुरुवात होतात. ही लक्षणं त्या सापाचं विष कोणत्या प्रकारचं आहे, त्यावर अवलंबून असतात मात्र साप कोणताही असो विषारी किंवा बिनविषारी साप चावल्यानंतर तुम्ही तात्काळ वैद्यकीय मदत घ्या, योग्य त्या डॉक्टरांकडून उपचार घ्या, अन्यथा ते तुमच्या जीवावर देखील बेतू शकतं, साप चावल्यानंतर कोणत्याही मांत्रिकाकडे किंवा बाबाकडे न जाता थेट डॉक्टरांकडे जा, ज्यामुळे तुमच्यावर योग्य उपचार होतील.