पंढरपूर - ‘पावलो पंढरी वैकुंठ भुवनी!’ हा आत्मानंद सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या मनामध्ये आहे. टाळ मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष सुरू असल्याने पंढरी दुमदुमून गेली आहे.
यंदा पाऊस लवकर सुरू झाल्याने पेरण्या उरकून अनेकांनी पंढरीची वाट धरली. सर्वच पालखी सोहळ्यांमध्ये वारकऱ्यांची संख्या अधिक पाहायला मिळाली. पंढरपूरमध्ये विक्रमी सुमारे बारा ते पंधरा लाख भाविक आल्याचा अंदाज आहे.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकरी पेरण्या उरकून वारीत सहभागी झाले आहेत यंदा संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७५० जन्मोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे माउलींच्या सोहळ्यातील वारकऱ्यांची गर्दी दरवर्षीच्या तुलनेत दीड ते दोन पट अधिक होती.
तसेच संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा असल्याने त्याही सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या अधिक आहे. सर्वच संतांच्या पालख्यांमध्ये वारकऱ्यांची संख्या वाढली आहे.
पंढरीत पालख्यांसमवेत सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक वारकरी दाखल झाले तर वाहनाने थेट पंढरीत येणाऱ्या भाविकांची संख्याही अधिक आहे. गेल्या दोन दिवसांपासून पालखी सोहळे पंढरीत दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे हरिनामाचा गजर सुरू आहे.
चंद्रभागेत स्नानासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पुंडलिक मंदिर, नामदेव पायरी, कळस दर्शन करून काही भाविकांनी पंढरीत मुक्काम केला आहे. आषाढी वारीसाठी उजनीतून पाणी सोडण्यात आले आहे. विठ्ठल दर्शनाची रांग गोपाळपुरापुढे गेली आहे.
त्यात आज संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव यांचे पालखी सोहळे दाखल झाल्यानंतर गर्दी आणखी वाढली. रस्ते मोठे केले असले तरी ते वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. पंढरपूर तसेच परिसर दिंड्यांच्या तंबूंनी भरून गेला आहे.