मुंबईत राज-उद्धव यांचा 'विजयी मेळावा', भाषणात राजकीय युतीबाबत संकेत देणार का?
BBC Marathi July 06, 2025 06:45 AM
BBC

हिंदी सक्तीच्या निर्णयाला झालेल्या विरोधानंतर सरकारनं हा निर्णय रद्द केला. या विरोधात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा काढणार होते. पण निर्णय रद्द झाल्यानंतर मोर्चाऐवजी विजयी मेळावा होणार आहे.

थोड्याच वेळात हा मेळावा होत आहे. त्यात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल पण राज आणि उद्धव ठाकरे यासाठी एकाच मंचावर येणार आहेत.

यापूर्वी मोर्चाचा निर्णय झाला तेव्हा संजय राऊत यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो पोस्ट करत एक फेसबूक पोस्ट केली होती.

या मेळाव्यामध्ये राज किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडून दोन्ही पक्षांच्या युतीबाबत काही संकेत मिळणार का? याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

संकेत की संदेश?

"महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. मी तुम्हाला फक्त एका वाक्यात सांगितलं. याबाबत जे काही बारकावे आहेत ते आम्ही तपासून पाहत आहोत. मी तुम्हाला फक्त संदेश नाही, तर थेट बातमी देईन. माझ्या शिवसैनिकांच्या मनात काहीही संभ्रम नाही. त्यामुळे संदेश वगैरे देण्यापेक्षा जी काही बातमी द्यायची ती आम्ही देऊ."

उद्धव ठाकरेंनी हे सूचक वक्तव्य राज ठाकरेंच्या मनसे पक्षासोबतच्या युतीबद्दल केलं होतं. अनेक वर्षांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असं बोललं जातं. तशा चर्चाही रंगतात.

गेल्या काही दिवसांपासून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा हे दोन्ही भाऊ एकत्र येतील या चर्चांनी जोर धरला आहे.

कारण, दुसरं तिसरं कोणी नाही, तर थेट राज आणि उद्धव या दोन्ही भावांनी तसे संकेत दिले आहेत.

त्यानंतर मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी मोर्चाची घोषणा केली आणि सगळ्यांनी पक्षांचा झेंडा बाजुला ठेवून सहभागी होण्याचं आवाहन केलं. त्याला उद्धव ठाकरे गटाकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.

संजय राऊत यांनी पोस्ट करून दोघं भाऊ मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र येणार असं स्पष्ट केलं होतं.

पण सरकारनं हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर मोर्चाही रद्द झाला. पण सरकारला माघार घ्यावी लागल्याने राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे विजयी मेळावा घेण्याचा निर्णय घेतला.

ही बातमी अपडेट होत आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

  • राज-उद्धव यांचा एकत्र मेळावा, दोघे भाऊ एकत्र आल्यास 'मुंबई'वर वर्चस्व मिळवू शकतील का?
  • राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खरंच एकत्र येतील? ठाकरे बंधूंची 20 वर्षांनंतर जोडी जमेल का?
  • राज ठाकरेंना पक्षाच्या स्थापनेच्या 19 वर्षांनंतरही सत्तेचा सूर का गवसत नाहीय?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.