वृद्धापकाळातली हेरगिरी!
esakal July 06, 2025 09:45 AM

अक्षय शेलार - shelar.abs@gmail.com

‘अ मॅन ऑन दि इनसाइड’ ही मालिका वृद्धत्व हा केवळ आयुष्याचा उत्तरार्ध नसून अनुभवांची पुनर्मांडणी करण्याची संधी असू शकते, ही बाब ठामपणे मांडते. ती रंजक आहे, पण तितकीच संयत आहे. जणू मौनात एक नवा सूर ऐकू यावा, इतकी संयत. या भूमिकेत टेड डॅन्सन आपल्या दीर्घ कारकीर्दीवर सूक्ष्म भाष्य करताना दिसतो.

एकविसाव्या शतकात ज्या उत्तम व लोकप्रिय सिटकॉम तयार झाल्या आहेत, त्यामध्ये मायकल शर हा कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं सहभागी होता. ‘दि ऑफिस’मध्ये (२००५-२०१३) लेखक आणि निर्माता म्हणून त्याला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्यानं ग्रेग डॅनियल्ससोबत ‘पार्क्स अँड रिक्रिएशन’ (२००९-२०१५) बनवली. नंतरच्या काळात त्यानं तयार केलेल्या ‘ब्रुकलिन नाइन-नाइन’ (२०१३-२०२१) आणि ‘द गुड प्लेस’ (२०१६-२०२०) या दोन्ही लोकप्रिय सिटकॉम समांतरपणे सुरू होत्या. इतक्या सातत्यानं इतक्या दर्जेदार मालिका बनवण्याच्या बाबतीत चक लोरीपाठोपाठ मायकल शरचाच नंबर लागतो. नेटफ्लिक्सवरील ‘अ मॅन ऑन दि इनसाइड’ ही मालिका म्हणजे शरच्या या प्रभावी कामाच्या यादीतील नवी, लक्षवेधक भर.

‘अ मॅन ऑन दि इनसाइड’ वरकरणी एक नर्मविनोदी तपासकथा वाटते. ही तपासकथा घडते एका वृद्धाश्रमात. चार्ल्स (टेड डॅन्सन) हा एक निवृत्त प्राध्यापक आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर एकाकी पडलेल्या चार्ल्सला त्याची मुलगी एमिली (मेरी एलिझाबेथ एलिस) फावल्या वेळात काहीतरी करायला हवं असा आग्रह करते. त्यानंतर तो एका आगळ्यावेगळ्या नोकरीवर रुजू होतो. ही नोकरी काय, तर जूलीच्या (लायला रिचक्रीक एस्त्रादा) खासगी गुप्तचर संस्थेच्या कामासाठी तो एका वृद्धाश्रमात ‘मोल’ (फुटिर हेर) म्हणून दाखल होतो. पण, ही संस्था किंवा त्याचं गुप्त मिशन इथून सुरुवात झालेली ही कथा हळूहळू अधिक मार्मिक मुद्द्यांना स्पर्श करू लागते. वृद्धापकाळातील एकटेपणा आणि एकाकीपण, ओळखीच्या लोकांना वेगवेगळ्या अर्थानं गमावून बसणं, प्रेम व स्नेह या गोष्टींची होणारी नव्याने ओळख आणि संथपणे उलगडत जाणारं पुनर्संवादाचं प्रयोजन अशा बऱ्याचशा बाबी मालिकेत येतात.

चार्ल्सचा शोध खरं तर कोणत्यातरी गुन्हेगाराचा नसून पत्नीच्या जाण्यानंतर स्वतःला हरवून बसण्याविषयीचा अधिक आहे. मालिकेचा गाभा हा कोणाला दोषी ठरवणं नाही, तर चार्ल्ससारख्या व्यक्तीच्या आयुष्यात उरलेल्या नात्यांना समजून घेणं आहे. एकटेपणाच्या चौकटीत अगदी शिस्तीत जपून ठेवलेले दुःख उमजून घेण्याचा आणि चार्ल्सच्या मनोवृत्तीला हळुवार ढवळून काढण्याचा हा प्रवास आहे. टेड डॅन्सनचा अभिनयातून संवादांमधून नव्हे, तर त्या संवादांमधल्या जागांमधून चार्ल्स हा माणूस अंतर्बाह्य समोर येतो. वर्जिनिया (सॅली स्ट्रथर्स) आणि कल्बर्ट (स्टीफन मॅककिनली हेंडरसन) यांच्यासोबत निर्माण होणारे संबंध, त्यांच्या संवादांमधून प्रकट होणारा सूक्ष्म विनोद आणि तुटक ऊबदारपणा या मालिकेचा महत्त्वाचा भाग बनतो.

ही मालिका फार भपकेबाज नाही किंवा काळजीपूर्वक रचलेल्या थरारपटाप्रमाणे अपेक्षित-अनपेक्षित वळणंदेखील घेत नाही. मानवी भावनांच्या अस्पष्ट रेषा, नात्यांमधील कमी-जास्त होणारं अंतर आणि सामाजिक-वैयक्तिक स्तरावरील तुटकपणा इथला गाभा आहेत. आणि ‘गुप्तचर’ ही भूमिका प्रत्यक्षात एक प्रकारची प्रतीकात्मक जबाबदारी आहे, स्वतःला पुन्हा शोधून काढण्याची. त्यामुळे इथल्या शीर्षकातून दोन अर्थ निघतात. पहिला उघड अर्थ आहे तो म्हणजे हेरगिरी करणाऱ्यांबाबतीत कायम वापरला जाणारा, तर दुसरा अर्थ आहे चार्ल्सच्या मनात दडून असलेला मूळ चार्ल्स. त्यामुळेच एक व्यक्ती स्वतःच्या हरवलेल्या अस्तित्त्वाशी पुन्हा संवाद साधू लागते, अशी ही गोष्ट.

‘अ मॅन ऑन दि इनसाइड’ ही मालिका वृद्धत्व हा केवळ आयुष्याचा उत्तरार्ध नसून अनुभवांची पुनर्मांडणी करण्याची संधी असू शकते, ही बाब ठामपणे मांडते. ती रंजक आहे, पण तितकीच संयत आहे. जणू मौनात एक नवा सूर ऐकू यावा, इतकी संयत. या भूमिकेत टेड डॅन्सन आपल्या दीर्घ कारकीर्दीवर सूक्ष्म भाष्य करताना दिसतो. त्याच्या आजवरच्या कामाच्या समृद्धतेतून आलेला संयम आणि आता दृश्यांच्या अंतःप्रवाहात जाण्याची तयारी आणि क्षमता असलेला हा अभिनेता. ही मालिका त्याच्या कारकीर्दीतील नवे वळण नाही, पण नवा सूर जरुर आहे, संथ नि गहिरा सूर.

मालिकेच्या अखेरीस चार्ल्सला आणखी एका रंजक, रोचक कामगिरीवर जाणार असल्याचा संकेत मिळतो. तत्पूर्वी त्याची ही पहिलीवहिली हेरगिरी नक्की पाहावी अशी आहे. ‘अ मॅन ऑन दि इनसाइड’ नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.