‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्करला स्टेज 2 लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर तिच्यावर सर्जरी करण्यात आली. दीपिकाच्या प्रकृतीविषयी तिचा पती आणि अभिनेता शोएब इब्राहिम सतत व्लॉगच्या माध्यमातून अपडेट देतोय. नुकत्याच एका व्लॉगमध्ये शोएबने आता दीपिकाच्या पुढील ट्रीटमेंटविषयी सविस्तर माहिती दिली. शोएबने सांगितलं की दीपिकाच्या शरीरात सध्या कर्करोगाच्या पेशी नाहीत. परंतु ट्युमरला ‘ग्रेड थ्री’ म्हणून वर्गीकृत केल्याने तो खूपच आक्रमक होता, असं त्याने म्हटलंय. त्यामुळे दीपिकाला पुन्हा ट्युमर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
“आधी आम्हाला वाटलं होतं की जर ट्युमर काढून टाकला, तर सर्वकाही ठीक होईल. सध्या तरी तिच्या शरीरात कॅन्सरच्या पेशी नाहीत. परंतु आम्हाला मिळालेल्या बायोप्सी रिपोर्ट आणि आम्ही तपासलेल्या पीईटी स्कॅनमध्ये अधिक गंभीर परिस्थिती असल्याचं दिसून आलं. ट्युमरला ग्रेड थ्री म्हणून वर्गीकृत करण्यात आलं होतं आणि तो खूप कमी प्रमाणात दिसून येतो. याचा अर्थ तो खूपच आक्रमक होता. त्यामुळे तो पुन्हा होण्याची शक्यता अधिक असते”, असं सांगत शोएबने चिंता व्यक्त केली.
View this post on Instagram
A post shared by Dipika (@ms.dipika)
यापुढे त्याने दीपिकाच्या ट्रीटमेंटविषयीची माहिती दिली. लिव्हर कॅन्सरवर दोन प्रकारचे ट्रिटमेंट्स करता येऊ शकतात. त्यापैकी एक इम्युनोथेरपी (आयव्ही ड्रीपद्वारे) आणि दुसरी तोंडी गोळ्या-औषधं घेऊन असते. दीपिका गोळ्या घेऊन उपचाराची सुरुवात करणार असल्याचं शोएबने सांगितलं. याविषयी तो पुढे म्हणाला, “सर्जरीनंतर डॉक्टरांनी काही औषधं दिली आहेत. सध्या जरी कॅन्सरच्या पेशी नसल्या तरी, भविष्यात त्या पेशी आढळल्यास, औषधांचा डोस वाढवला जाऊ शकतो. हा उपचार पुढील एक-दीड किंवा दोन वर्षांपर्यंत चालू शकतो. दर तीन आठवड्यांनी स्कॅन्स केले जातील.”
कॅन्सरचं निदान झाल्यानंतर शोएब आणि दीपिकाने त्यांच्या युट्यूब चॅनलवर एक व्लॉग पोस्ट केला होता. त्यामध्ये ती म्हणाली होती, “कॅन्सर हा शब्द प्रत्येकासाठी खूप भीतीदायक, घाबरवणारा असतो. हा आजार मानसिकदृष्ट्या खूप घाबरवतो. परंतु डॉक्टरांनी सांगितलं आहे की मी पूर्णपणे बरी होऊ शकते.